दैनिक स्थैर्य । दि. २३ ऑक्टोबर २०२२ । फलटण । दिवाळीसाठी राज्य सरकारने घोषणा केल्याप्रमाणे दिवाळी किट वाटप अद्यापपर्यंत मिळाले नाही. याबाबत फलटण शहर राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने फलटण तालुका पुरवठा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले
गोरगरिबांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तेल, साखर, डाळ वगैरे वस्तूंचे किट 100 रुपयात देण्याची घोषणा केली. परंतु अद्याप कोणत्याही रेशन दुकानात सदर किट उपलब्ध नाहीत. त्यामुळे गोरगरीब जनता दिवाळी फराळापासून दुर आहे. गरीबांच्या मुलांना गोडधोड खाण्याचा आनंद दिवाळी सण संपण्यापूर्वी तरी मिळावा यासाठी 100 रुपयात जाहीर केलेले किट व दर महिन्याला शिधापत्रिकेवर मिळणारे मोफत धान्य त्वरित स्वस्त धान्य दुकानात उपलब्ध करुन द्यावे अन्यथा ऐन दिवाळीत फलटण शहर राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन देण्यात आले.
यावेळी फलटण शहर काँग्रेसचे अध्यक्ष पंकज पवार ओबिसी सेल शहर अध्यक्ष विकास ननवरे, सुनिल निकुडे,अजय इंगळे,जयकुमार शिंदे तसेच राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.