दैनिक स्थैर्य । दि. २४ नोव्हेंबर २०२१ । फलटण । ‘‘नशिबाने संचालकपद मिळालेल्या लोकांनी आपली लायकी सोडून बोलू नये. आपण बहुमताने नाही तर चिठ्ठीद्वारे विजयी झालो आहोत याचे कायम भान ठेवावे. ना.श्रीमंत रामराजे हे आमचे नेते आहेत. त्यांच्या विरोधात पुन्हा वाचाळ बडबड कराल; तर याद राखा गाठ आमच्याशी आहे’’, असा कडक इशारा फलटण येथील राजे गटाचे कट्टर समर्थक प्रितसिंह अमरसिंह खानविलकर यांनी शेखर गोरे यांना प्रसिद्धीपत्रकान्वये दिला आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर माण तालुक्यातील शिवसेनेचे विजयी उमेदवार शेखर गोरे यांनी ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर टिका करत तोंडसुख घेतले होते. शेखर गोरे यांच्या या टिकेनंतर फलटण येथील राजेगटाचे कार्यकर्ते संतप्त झाले असून गोरे यांच्या विरोधात कार्यकर्त्यांमधून आक्रमक प्रतिक्रिया उमटत आहेत.
‘‘ना.श्रीमंत रामराजे हे विधान परिषदेचे सभापती आहेत. त्यांच्याविरोधात बोलताना त्यांच्या वयाचा, कार्याचा आणि पदाचा मान सर्वांनीच राखावा. दुसर्यावर टिका करताना आधी स्वत:ची कुवत लक्षात घ्यावी. निवडणूकीत जितक्या लोकांनी तुम्हाला मत दिले आहे तितक्याच लोकांनी तुम्हाला नाकारले आहे. इतकेच नाही तर याच निवडणूकीत दुसर्या मतदार संघातून तुम्ही सपशेल तोंडावर पडला आहात. टाय पडलेल्या मतदारसंघात केवळ सुदैवाने चिठ्ठी तुमच्या नावाची निघाली म्हणून तुम्ही संचालक झालात अन्यथा पुढच्या निवडणूकीची वाट बघत बसण्याची वेळ तुमच्यावर नक्की आली असती. कणभर विजयाने तुमच्या अंगात आलेली मणभर मस्ती उतरवायला आम्हाला वेळ लागणार नाही. पुन्हा जर आमच्या नेतृत्त्वावर तुम्ही विनाकारण टिका कराल; तर राजे गट शांत बसणार नाही हे कायम ध्यानात असू द्या’’, असेही शेखर गोरे यांना उद्देशून प्रितसिंह खानविलकर यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.