
स्थैर्य, फलटण : माजी केंद्रीय कृषिमंत्री व राज्यसभा खासदार शरद पवार यांचे कट्टर समर्थक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे यांना पहिल्यापासून खासदार शरद पवार यांच्याबरोबर कायम राहिल्याचे निष्ठेचे फळ मिळणार का ? त्यांना विधान परिषदेवर संधी देऊन शरद पवार सुभाष शिंदे यांचा गौरव करणार का ? अशा अनेक चर्चा सध्या फलटणसह सातारा जिल्ह्यातील राजकीय वर्तृळात होताना दिसत आहेत.
येत्या काही महिन्यांमध्ये विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे चार उमेदवार असून त्यातील एक जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिल्याचे स्पष्ट झाले आहे. सुभाषराव शिंदे यांनी आजवर सुमारे गेली 40 वर्षे खा.शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणात सक्रीय राहून कोणत्याही पदाची व सत्तेची अपेक्षा न करता राजकारणाबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सहकार आदी क्षेत्रात आपले योगदान दिलेले आहे. त्यांच्या या कार्याची व निष्ठेची दखल घेवून उर्वरित जागांमधील एक जागेवर खा. शरद पवार सुभाषराव शिंदे यांना संधी देऊ शकतात असे भाकीत राजकीय पंडितांकडून वर्तवले जात आहे.
सुभाषराव शिंदे यांनी केंद्रीय रेल्वे समितीवर काम केलेले आहेत. फलटण येथे रेल्वे सुरु करण्यासाठी प्रथम पुढाकार घेवून रेल्वेचा प्रस्ताव सुभाष शिंदे यांनी मांडला असल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगतात. त्याचबरोबर फलटण तालुका दूध पुरवठा संघाचे चेअरमन म्हणून सुभाषराव शिंदे यांनी उत्कृष्ट काम केलेले आहे. दूध पुरवठा संघातून काम करत असताना जास्तीत जास्त दूध संकलन करुन शेतकर्यांना अधिकाधिक दूध दर कसा देता येईल, याबाबत नेहमीच सुभाष शिंदे हे प्रयत्नशील राहिलेले आहेत. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी हे नेहमीच सुभाष शिंदे यांना मानत होते व अजूनही मानतात.
फलटण तालुक्यामध्ये नीरा देवधर चे पाणी येण्यासाठी व फलटण खंडाळा व माण तालुक्याला पाणी मिळण्यासाठी सुभाषराव शिंदे यांनी शिंगणापूर ते महाबळेश्वर पदयात्रा काढली होती. तसेच लोणंद येथे मोठी पाणी परिषदही आयोजित केली होती. फलटणसह माण, खंडाळा तालुक्यातील पाणी प्रश्नाची त्यांना चांगली जाण असून जर त्यांना विधानपरिषदेवर आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली तर नीरा-देवघर धरणावरील अपूर्ण कालवे ही पूर्ण करण्यामध्ये ते प्रामुख्याने भाग घेतील, अशी भावना शेतकरी वर्गातील त्यांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. यासोबतच फलटण तालुक्यामधील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, यासाठी सुभाष शिंदे हे विविध शिक्षण संस्थांच्या माध्यमातून कार्यरत आहेत.
सुभाष शिंदे यांचे संपूर्ण राज्यभर प्रसिद्ध असलेले कार्य म्हणजे, खा.शरद पवार, मंत्री अजित पवार, खा.सुप्रिया सुळे, सौ.सुनेत्रा पवार यांचे विविध पदांच्या माध्यमातून सुरु असलेले कार्य सर्वदूर पसरवण्यासाठी ते खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गेली तीस वर्षाहून अधिक वर्षे उत्कृष्ट असे पुस्तक प्रकाशित करतात. विशेष म्हणजे कोणत्याही जाहिराती न घेता व कुठेही गाजावाजा न करता स्वखर्चातून त्यांचे हे कार्य सुरु आहे. त्यांच्या या सार्या कार्याची व निष्ठेची दखल घेवून त्यांना विधानपरिषदेवर खा.शरद पवार यांनी संधी द्यावी, अशी भावना अनेक कार्यकर्त्यांकडून व्यक्त होताना दिसत आहे.