
दैनिक स्थैर्य । 9 एप्रिल 2025। फलटण । राज्याच्या विधीमंडळात उत्तर कोरेगाव भागातील 26 गावांचा व सर्वसामान्य शेतकर्यांचा जिव्हाळ्याचा पाणी प्रश्नांसंदर्भात प्रथम विषय उपस्थित केला. गेली अनेक वर्ष सत्तेत असतांना ज्यांना या भागाचा पाणी प्रश्न सुटला नाही या मंडळींनी आत्ता पाणी संघर्ष समिती तयार केली. गेली तीस वर्ष सत्ता तुमच्याकडे होती. मनात आणलं असतं तर 26 गावांचा पाणी प्रश्न 26 वर्षांपूर्वीच सोडवला असता. आता तुम्ही संघर्ष जरुर करा, म्हणजे आम्हांला काम करण्यास बळ येईल. जोपर्यंत भागातील 26 गावांतील जनतेला पाणी संदर्भात न्याय मिळत नाही व मूलभूत समस्या सोडविल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, असा विश्वास आ. सचिन पाटील व्यक्त केला.
कोरेगाव-फलटण मतदार संघातील उत्तर कोरेगाव तालुक्यातील 26 गावांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी वाठार स्टेशन येथे माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आ. सचिन पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित जनता दरबारप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी उपस्थित कृषी, महावितरण, महसूल, आरोग्य, शेती व सहकारी पतसंस्था अशा 110 विविध विभागाच्या तक्रारी विषयांवर सखोल चर्चा करुन, ऐंशी टक्के समस्यांचे व तक्रारीचे निवारण करण्यात आले. यावेळी कोरेगावचे प्रांताधिकारी अभिजीत नाईक, तहसिलदार संगमेश कोडे, गटविकास अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आ. सचिन पाटील म्हणाले, मी सर्वसामान्य जनतेचा व शेतकर्यांचा प्रतिनिधी म्हणून काम करत आहे. पाण्याच्या कामाला प्राधान्य दिले जाईल. पाण्यासंदर्भात असणार्या सर्व कामाच्या पूर्ततेसाठी प्रशासनाला सूचना केल्या आहेत. आमचे नेते माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर भागातील प्रश्न सोडविण्यासाठी आग्रही आहेत. त्यांच्या माध्यमातून यापूर्वी 0.52 टीएमसी पाणी मंजूर करुन घेतले आहे. नव्याने होणार्या सोळशी धरणातून भागाला अधिकचे पाणी मिळावे यासाठी महामंडळाकडे पाठपुरावा केला जाणार आहे. वीज वितरण, रस्ते, पाणी, महसूल, पतसंस्थेच्या समस्या व तक्रारी गंभीर होत्या. यावेळी संबंधित विभागाच्या अधिकार्यांना कायदेशीर व तांत्रिक अडचण दूर करुन संबंधित शेतकर्यांच्या समस्या सोडविण्याबाबत आ. पाटील यांनी अधिकार्यांना सूचना केल्या.
यावेळी तहसीलदार संगमेश कोडे यांनी उपस्थित तक्रारदरांच्या प्रश्नांचे व समस्येचे उत्तर सकारात्मकपणे निराकरण केले. यावेळी डॉ. सुयोग लेंभे, अमित चव्हाण, दत्तात्रय धुमाळ, विजय चव्हाण, यशवंत पवार, सचिन जाधव, सुधीर अडागळे, मंगेश शितोळे, राजेश काळोखे, बाळासाहेब देशमुख व पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.