जयंत पाटलांची ऑफर श्रीमंत रामराजे स्वीकारणार का ?

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. 08 फेब्रुवारी 2024 । फलटण । प्रसन्न रूद्रभटे । राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री, आमदार जयंतराव पाटील हे नुकतेच माढा लोकसभा मतदारसंघाच्या दौर्‍यावर आले असताना त्यांनी विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना पुन्हा शरद पवार गटाकडे येण्याची खुली ऑफर दिली होती. जयंत पाटील व श्रीमंत रामराजे यांचे जिव्हाळ्याचे संबंध राज्याला ज्ञात असून  जयंत पाटील खा.शरद पवार व आ.श्रीमंत रामराजे यांचे पॅचअप घडवून आणणार का ?, जयंत पाटलांची ऑफर श्रीमंत रामराजे स्वीकारणार का? आगामी येणार्‍या काळामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे पुन्हा शरद पवारांचा झेंडा हातात घेणार का ? अशा एक ना अनेक चर्चांना सध्या उधाण आलेले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे गेल्या काही दिवसांपासून लोकसभा मतदारसंघ निहाय दौर्‍यावर आहेत. यामध्ये माढा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत असताना विजय संकल्प सभेमध्ये ‘‘फलटणकरांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर झाली आहे. त्यांना अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संधी आहे’’, असे वक्तव्य करत एकप्रकारे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना पुन्हा पक्षात येण्यासाठी त्यांनी खुली ऑफर दिली होती. ‘‘आता महायुतीमध्ये गेल्यामुळे आगामी काळात श्रीमंत रामराजे यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या खासदार रणजितसिंह यांना जर महायुतीची उमेदवारी मिळाली तर खासदार रणजितसिंह यांचा प्रचार श्रीमंत रामराजेंना करावा लागेल. त्या ऐवजी त्यांनी माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वात पुन्हा यावे’’; अशी सादही जयंत पाटील यांनी आ.श्रीमंत रामराजेंना घातली आहे.

स्थानिक राजकारणातील अडचणींचा विचार

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती अर्थात भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना यांच्याकडून जर माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा संधी दिली तर फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमधील श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात काम करणार्‍या अनेकांना राजकीयदृष्ट्या अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. महायुती धर्म पाळायचा झाला तर श्रीमंत रामराजे यांच्यासह त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार लोकसभा निवडणूकीत करावा लागू शकतो. त्यामुळे आजवरचे खा.रणजितसिंह यांच्यासोबतचे राजकीय वैमनस्य लक्षात घेता, तसेच स्थानिक राजकारणातील संभाव्य अडचणी विचारात घेऊन श्रीमंत रामराजे नक्की काय निर्णय घेणार? याकडे फलटण विधानसभा मतदारसंघासह सातारा व सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

कार्यकर्त्यांच्यात अस्वस्थता

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी गतकाही महिन्यांपूर्वी भारतीय जनता पार्टी सोबत जाण्याचा निर्णय घेतला व सत्तेमध्ये ते सहभागी झाले. त्यांच्यासोबत सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांना मंत्रिपदे मिळाली. त्यावेळी आ.श्रीमंत रामराजे यांनाही मंत्रिपद अथवा पुन्हा एकदा विधानपरिषदेचे सभापतीपद मिळेल असा अंदाज अनेकजण बांधत होते. मात्र; आजवर यापैकी काहीच न घडल्यामुळे आ.श्रीमंत रामराजेंच्या कार्यकर्त्यांमध्येही अस्वस्थता असल्याचे पहायला मिळत आहे.

मेळाव्यातून मुख्य प्रश्‍न अनुत्तरीत

गतकाही दिवसांपूर्वी आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली फलटण येथे कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला आहे. सदरील मेळाव्याच्या फ्लेक्सवर व सोशल मीडियावरील पोस्टवर कोणत्याही पक्षाचे चिन्ह व कोणत्याही नेत्याचा फोटो नव्हता. त्यामुळे त्यावेळी सुद्धा श्रीमंत रामराजेंच्या भूमिकेविषयी विविध चर्चा या सुरू झाल्या होत्या. सदर मेळाव्यात श्रीमंत रामराजे यांनी जरी याबाबतचे स्पष्टीकरण दिले असले तरी यासोबतच त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघांमधून श्रीमंत संजीवराजे यांना महायुतीची उमेदवारी मिळावी व त्यांना खासदार म्हणून निवडून पाठवण्यासाठी आग्रही भूमिका मांडली होती. जर संजीवराजे यांना उमेदवारी नाही मिळाली; तर विद्यमान खासदारांना सुद्धा उमेदवारी मिळू देणार नाही, असेही विधान त्यांनी मेळाव्यात केले होते. मात्र; महायुतीकडून खा.रणजितदादांनाच लोकसभेची उमेदवारी मिळाली तर राजे गट काय करणार? याचे उत्तर मात्र या मेळाव्यातून कार्यकर्त्यांना मिळाले नव्हते.

शरद पवारांशी जवळीक शक्य

विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार यांच्यातील संबंध हे सर्वश्रुत आहेत. श्रीमंत रामराजे हे सत्तेमध्ये सहभागी झाले असले तरी एखादा अपवाद वगळता त्यांनी शरदचंद्रजी पवार यांच्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष टीका केलेली नाही. यासोबतच सत्तेमध्ये सहभागी झाल्यानंतर माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार यांची श्रीमंत रामराजे यांनी विविध कारणास्तव भेट घेतली असल्याच्या बातम्या सुद्धा प्रसारमाध्यमांनी प्रकाशित केल्या आहेत. त्यामुळे आगामी काळामध्ये श्रीमंत रामराजे पुन्हा शरद पवारांच्या नेतृत्वात कामकाज करणार का ? या प्रश्‍नाचे उत्तर मात्र येणारा काळच ठरवेल.


Back to top button
Don`t copy text!