जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादींबरोबर शिवसेनाही एकत्र लढणार?

जिल्हा बँकेत चर्चा; मंत्री मकरंद पाटील, खा. नितीन पाटील अन् मा. आ. बाळासाहेब पाटलांमध्ये खलबते


स्थैर्य, 17 जानेवारी, सातारा : जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याच्या हालचालींना वेग आला असून, आज रात्री जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी मंत्री बाळासाहेब पाटील, खासदार नितीन पाटील यांच्यात सुमारे दोन तास बंद दाराआड चर्चा झाली. यामध्ये निवडणूक एकत्र लढण्याबाबत प्राथमिक चर्चा झाली. काल पालकमंत्री आणि शिवसेना नेते शंभूराज देसाई यांच्याशीही याबाबत चर्चा झाल्यानंतर आता जागा वाटप तीन पक्षांचे नेते एकत्र बसून रविवारी निश्चित करणार आहेत.

जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपचा वारू रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना असे नवीन समीकरण जिल्ह्यात उदयास आले आहे. याआधी शिवसेनेचे नेते व पालकमंत्री शंभूराज देसाई, मदत आणि पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, माजी सभापती रामराजे, संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यात एकत्र लढण्याबाबत चर्चा झाली होती.

शुक्रवारी सायंकाळी राष्ट्रवादी भवनातील मुलाखती संपल्यानंतर मंत्री मकरंद पाटील व नितीन पाटील यांनी थेट जिल्हा बँकेत जाऊन शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली. या वेळी राष्ट्रवादीचे सरचिटणीस राजकुमार पाटील उपस्थित होते. या चर्चेत दोन्ही राष्ट्रवादी व एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र लढण्याचा निर्णय झाला, तसेच तिघांमध्ये जागा वाटपाचा विषय येत्या रविवारी सोडवल्या जाणारआहे. त्यापूर्वी काल रात्री शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार शशिकांत शिंदे यांच्या निवासस्थानी मकरंद पाटील, नितीन पाटील यांची गुप्त बैठक झाली होती. त्यांनी एकत्र लढण्याच्या निर्णयाला हिरवा कंदील दिला होता.  या चर्चेला जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत अंतिम निर्णय घेण्यात आला. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या विरोधात दोन्ही राष्ट्रवादी व शिंदेंची शिवसेना यांच्या युतीतच लढत पाहायला मिळणार आहे.


Back to top button
Don`t copy text!