धनुर्विद्या प्रशिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना सर्वोतोपरी सहकार्य करणार : डॉ. सचिन सूर्यवंशी – बेडके

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. 27 फेब्रुवारी 2022 । फलटण । श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या यशवंतराव चव्हाण हायस्कुल व ज्यूनियर कॉलेज येथे पिस्टल रायफल शुटींग व आर्चरी (धनुर्विद्या) प्रशिक्षणचा शुभारंभ होत आहे, ही कौतुकास्पद बाब आहे. या खेळांचे प्रशिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना सर्वोतोपरी सहकार्य करु असे प्रतिपादन संस्थेचे मानद सचिव डॉ. सचिन सूर्यवंशी – बेडके यांनी केले.

श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या यशवंतराव चव्हाण हायस्कुल व ज्यूनियर कॉलेज येथे पिस्टल रायफल शुटींग व आर्चरी ( धनुर्विद्या ) प्रशिक्षणाचा शुभारंभ डॉ. सचिन सूर्यवंशी-बेडके यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी बेडके बोलत होते.

गत दोन वर्षात कोरोना महामारी, लॉकडाउन यामुळे खेळावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. परंतू आता ग्रामीण भागातील मुलामुलींनी पुन्हा नव्या जोमाने खेळाकडे वळावे व आपला नावलौकिक करावा. फलटणच्या ग्रामीण भागातील सरडे येथील तीरंदाज प्रवीण जाधव याने अॉलंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले व उत्तम कामगिरी केली आहे, त्याच्यासह विविध खेळांमध्ये चमकदार केलेल्या खेळाडूंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा असे आवाहनही सचिन सूर्यवंशी-बेडके यांनी यावेळी केले.

यावेळी वरिष्ठ लिपीक चंद्रकांत पवार यांनी प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना खेळाचे साहित्य भेट दिले. कार्यक्रमास सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा. डी. आर. माने यांनी, सुत्रसंचलन एस. डी. यादव यांनी केले. आभार प्रा. पंकज बोबडे यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!