निरा – देवधर प्रकल्पास भरीव निधी देणार; केंद्रीय जलशक्ती मंत्री ना. गजेंद्रसिंह शेखावत यांची माहिती; खासदार रणजितसिंह यांच्या प्रयत्नांना यश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १३ फेब्रुवारी २०२३ | पंढरपूर | गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या नीरा देवधर प्रकल्पाला राज्य शासनाने आता मंजुरी दिलेली आहे. नीरा देवधर प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून भरीव निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी दिली. माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले.

पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत बोलत होते. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आमदार समाधान आवताडे, आमदार शहाजी पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे सोलापूर व सातारा जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी अधिक माहिती देताना केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत म्हणाले की, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विनंतीला मान देऊन आपण आज निरा – देवधर व कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्पाची हवाई पाहणी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले दोन्हीही प्रकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी केंद्र सरकार अनुकूल आहे ज्या काही तांत्रिक अडचणी होत्या त्या दूर करून लवकरात लवकर दोन्हीही प्रकल्प पूर्णत्वास जातील.

मी स्वतः दुष्काळी भागाचा खासदार असल्याने दुष्काळी भागातील जनतेचे दुःख मला माहित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशामधील कोणताही भाग हा दुष्काळी न राहता त्या दुष्काळी भागासाठी ठोस अश्या उपायोजना करण्याचे स्पष्ट निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील निरा – देवधर किंवा कृष्णा – भीमा स्थिरीकरण या दोन्ही प्रकल्पांची रखडलेली कामे तातडीने सुरू होतील, असे आश्वासन केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी दिले.

माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी लोकसभा मतदारसंघातील दुष्काळ कायमस्वरूपी हटवण्यासाठी विशेष प्रयत्न केलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुद्धा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे. आगामी काळामध्ये सोलापूर व सातारा जिल्ह्यामधील दुष्काळी भागामध्ये पाणी आणण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार अनुकूल आहे, असेही केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी यावेळी स्पष्ट केले.

राज्यामध्ये असणाऱ्या यापूर्वीच्या सरकारने निरा देवधर व कृष्णा भीमा स्थिरीकरण हे दोन्हीही प्रकल्प राजकीय हेतूमुळे रखडवून ठेवलेले होते. निरा – देवधरचे असलेले पाणी बारामतीला वळवण्यासाठी पूर्वीच्या सरकारने बरेच प्रयत्न केले होते. परंतु आता राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारने निरा – देवधर प्रकल्पास मंजुरी देऊन रखडलेले प्रकल्प मार्गी लागण्यासाठी विशेष प्रयत्न केलेले आहेत, असेही यावेळी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी स्पष्ट केले.

यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नीरा देवधर व कृष्णा भीमा स्थिरीकरण या दोन्ही प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली व केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी केलेल्या पाहणी मुळे दोन्ही प्रकल्पांना गती प्राप्त होईल, असा विश्वास खासदार निंबाळकर यांनी यावेळी व्यक्त केला.


Back to top button
Don`t copy text!