दैनिक स्थैर्य । दि. १४ जुलै २०२१ । फलटण । ‘‘तुमच्याकडे काही करुन दाखवण्याची इच्छा असेल तर कोणतीही समस्या तुम्हाला रोखू नाही शकत; हे प्रविण जाधव व त्यांच्या मात्या पित्यांनी करुन दाखवले आहे. अगदी तळागाळातून योग्य व्यक्तीची निवड झाल्यावर देशाची प्रतिभा जगात कशी उंचावली जाते हे देखील यातून सिद्ध झाले आहे’’, असे गौरवोद्गार व्यक्त करत ‘‘जपान मे जमकर खेलीएगा’’, अशा शब्दात प्रोत्साहन देत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिरंदाज प्रविण जाधव यांना शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेला जाणार्या भारतीय खेळाडूंच्या पथकाशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. त्यामध्ये सरडे (ता.फलटण) गावचे सुपुत्र प्रविण जाधव, त्यांचे वडील रमेश जाधव व आई संगिता जाधव यांचाही समावेश होता. स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न पंतप्रधानांनी या संवादाद्वारे केला. युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर, युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक आणि कायदे मंत्री किरेन रिजिजू देखील यावेळी उपस्थित होते.
पंतप्रधांनांनी महाराष्ट्रातील तिरंदाज प्रवीणकुमार जाधवशी, ‘‘कसे काय प्रवीणजी !’’ असे मराठीतून म्हणत , जाधव यांचा आतापर्यंतचा प्रवास जाणून घेतला. आधी धावपटू म्हणून प्रशिक्षण घेतलेल्या मात्र आता ऑलिम्पिकमध्ये तिरंदाज म्हणून देशाचे प्रतिनिधित्व करणार्या प्रवीणच्या प्रवासातील परिवर्तनाविषयी पंतप्रधानांनीं विचारले असता प्रवीणकुमार म्हणाले, ‘‘पहिल्यांदा मी धावायचो त्यामुळे सरकारच्या अकादमीत धावपटू म्हणून माझी निवड झाली , मात्र शरीर कमजोर असल्यामुळे तिथल्या प्रशिक्षकांनी तिरंदाजीत प्रयत्न करायला सांगितले मग मी अमरावतीत तिरंदाजीसाठी प्रशिक्षण घेऊ लागलो. घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे पुढे जाऊन काहीतरी चांगले करण्यासाठी मी तिरंदाजीत सातत्य ठेवल’’,े असे प्रवीण पुढे म्हणाले.
कुटूंबियांच्या प्रकृतीची विचारपूस
रमेश जाधव व सौ.संगिता जाधव यांच्याशी संवाद साधताना पंतप्रधानांनी मराठीतून ‘‘प्रकृती बरी आहे नां?’’ असे विचारुन, ‘‘मोल मजुरी करुन प्रविणच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले त्याचे आई – वडिल प्रविणप्रमाणेच खरे चॅम्पीयन आहेत. प्रामाणिक कष्टाची ताकद काय असते हे प्रविणच्या पालकांनी सिद्ध करुन दाखवले आहे’’, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
यावेळी, कुठल्याही प्रकारचा दबाव न घेता स्पर्धेमध्ये आपले सर्व कौशल्य दाखवत झोकून देण्याचे पंतप्रधानांनी सर्व खेळाडूंना आवाहन केले.
‘‘आज खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी पंतप्रधान तुम्हा खेळाडूंसोबत आहेत आणि त्याच्या रूपाने हा संदेश दिला गेला आहे 130 कोटी भारतीय तुमच्या पाठीशी आहेत. तुम्ही पुढे चालत राहा आणि देशासाठी पदक मिळवून आणा’’, असे आवाहन यावेळी क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले.