स्थैर्य, पणजी, दि.४: महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र येत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले आहे. आता याच धर्तीवर गोव्यातही राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप विरोधी मोट बांधण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा गोव्यातल्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कुटुंबासह खाजगी दौ-यावर गोव्यात आहेत. त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे आहेत. यादरम्यान, त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, काँग्रेसचे नेते अश्विन खलप यांच्या भेटी घेऊन दीर्घ चर्चा केली.
या भेटीचे फोटो खासदार सुळे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहेत. या चर्चेचा कोणता तपशील बाहेर आला नसला तरी शरद पवार हे महाराष्ट्राच्या धर्तीवर गोव्यातही भाजप विरोधातील मोठ बांधू शकतात, असं बोलले जात आहे.
सध्या गोवा विधानसभेत भाजपची सत्ता असून एका अपक्षाचा पाठिंबा आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये 13 जागा जिंकून सुद्धा भाजपनं गोवा फॉरवर्ड पक्ष 3, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष 3, आणि 3 अपक्षांच्या सहाय्याने सरकार बनवलं होतं. पुढे भाजपने महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या दोन आमदारांना भाजपात प्रवेश केला तर 17 जागा निवडून आलेल्या काँग्रेसमधील 14 आमदार भाजपमध्ये गेले. त्याचवेळी भाजपनं महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि गोवा फॉरवर्ड पक्ष आणि दोघा अपक्षांना सत्तेच्या बाहेर काढले.
सध्या भाजपच्या स्वत:च्या आमदारपेक्षा बाहेरून आलेल्या आमदारांची संख्या भाजपमध्ये जास्त असून या सर्वांची गोळाबेरीज 27 होते. यापैकी काँग्रेसमध्ये भाजपमध्ये गेलेला मोठा ग्रुप फोडण्यात विरोधी दलाला यश आल्यास गोव्यातल्या राजकारणामध्ये सत्तांतर होऊ शकतो.