
स्थैर्य, फलटण, दि. 16 ऑगस्ट : कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर तसेच भाजपचे फलटण तालुका पूर्व मंडल अध्यक्ष लक्ष्मणराव सोनवलकर यांनी आज पुणे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी फलटण तालुक्याच्या विकासाला कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन दिले.
सुमारे वीस मिनिटे चाललेल्या या बैठकीत विविध विषयांवर सखोल चर्चा झाली. यामध्ये प्रामुख्याने नीरा-देवघर कालवे, फलटण तालुक्यात होऊ घातलेली एमआयडीसी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यावर चर्चा करण्यात आली.
माणिकराव सोनवलकर आणि लक्ष्मणराव सोनवलकर यांच्या भाजप प्रवेशाने तालुक्यातील पक्षाची ताकद वाढली आहे. त्यामुळे या भेटीमुळे आगामी काळात फलटण तालुक्यातील विविध विकास कामांना गती मिळेल, असे मानले जात आहे.