
दैनिक स्थैर्य | दि. १५फेब्रुवारी २०२३ | फलटण | फलटण तालुक्यासह सातारा व सोलापूर जिल्ह्याला विकासकामांना जी खीळ बसली होती; ती पुन्हा नव्या जोमाने सुरु करण्यासाठी आपले सरकार कटिबद्ध असून आगामी काळामध्येसुद्धा फलटण तालुक्यासह सातारा व सोलापूर जिल्ह्यातील कोणत्याही प्रकल्पाला निधी कमी पडू देणार नाही; असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिले.
सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण व सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस व सांगोला या तालुक्यातील कायमस्वरूपी दुष्काळी भाग हि ओळख आता पुसली जाणार आहे. निरा – देवधरच्या प्रकल्पाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिल्याने आता हा रखडलेला प्रकल्प मार्गी लागणार आहे. यासोबतच झिरपवाडी येथील शासकीय रुग्णालयाला निधी दिल्याबद्दल व फलटण येथे अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या रखडलेल्या कामास मंजुरी दिल्याबद्दल खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून आभार व्यक्त केले. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
पूर्वीच्या सरकारने लोकहितार्थ असणारे बरेचसे प्रकल्प रखडवले होते. परंतु आताचे सरकार हे सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे जे प्रकल्प असतील ते कोणतेही प्रकल्प रखडले जाणार नाहीत. आपले सरकार जे आहे ते अतिशय खंबीर असून आगामी काळामध्ये सुद्धा नागरिकांच्या दृष्टीने महत्वाचे असलेले सर्व प्रकल्प मार्गी लावण्यात येतील, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.