पालिकेतील दोषांना योग्य वेळी तोंड फोडणार : ना.श्रीमंत रामराजेंचा स्वकियांना इशारा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. 04 ऑक्टोबर 2021 । फलटण । फलटण शहरात दर्जेदार नागरी सुविधा देण्याचा आपण नेहमीच प्रयत्न केलेला आहे. गेल्या 30 वर्षात शहर विकासासाठी कधीच निधी कमी पडू दिलेला नाही. शहरात अद्यापही काही अडचणी आहेत. पालिकेच्या कारभारातही काही दोष आहेत. पालिकेच्या दोषांना योग्य वेळी मी तोंड फोडणारच आहे; अशा शब्दात महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्वकियांना इशारा दिला.

शहरातील प्रभाग क्रमांक 6 मधील शंकर मार्केट परिसरात पुन:स्थापना करण्यात आलेल्या लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याचे अनावरण ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी फलटण – कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक चव्हाण, नगराध्यक्षा सौ.निता नेवसे, ज्येष्ठ नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, सौ.प्रगतीताई कापसे, अ‍ॅड.सौ.मधुबाला भोसले, सनी अहिवळे, सौ. सुवर्णा खानविलकर, सौ.वैशाली चोरमले, श्रीमती रंजना कुंभार, बाळासाहेब मेटकरी, अजय माळवे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

ना.श्रीमंत रामराजे पुढे म्हणाले, आमच्या कामात दोष अजिबात नाहीत असे मी म्हणणार नाही. पण समस्या सोडवण्याचा मुलभूत प्रयत्न आमच्याकडून होत आहे हे लक्षात घ्यावे. शहरात पाणी पुरवठ्याची अडचण होती तीही सोडवण्यात यश आले आहे. मी आमच्या चुका मान्य करेन पण आम्ही काहीच कामे केली नाहीत असा जर कोणी आरोप करत असेल तर ते मी मान्य करणार नाही. झालेल्या चुका निश्‍चितपणे सुधारी पण आम्हाला नाकारण्यापूर्वी आम्ही केलेल्या चुका सावरण्याची क्षमता विरोधकांच्यात आहे का? याचाही विचार नागरिकांनी जरुर करावा, असेही ना.श्रीमंत रामराजे यांनी यावेळी स्पष्ट केले.

पालिकेच्या माध्यमातून शंकर मार्केटमधील लोकमान्यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण झालेले आहे. आज लोकमान्य टिळकांच्या कार्याचे स्मरण होणे आवश्यक असून विशेषत: तरुण पिढीला त्यांच्या कार्याची ओळख करुन देणे आवश्यक असल्याची अपेक्षाही यावेळी ना.श्रीमंत रामराजे यांनी यावेळी व्यक्त केली.

इच्छुकांची माझ्या मागे गर्दी

गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या परिस्थितीमुळे अनेक कामे प्रलंबित राहिली आहेत. कोवीडच्या परिस्थितीत सगळ्याच कामांवर बंधने आली होती. गर्दी टाळण्यासाठी मी ही जास्त बाहेर पडत नव्हतो असे सांगून आत्ता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरीही आगामी निवडणूकांच्यामुळे मी बाहेर पडलो की माझ्या मागे इच्छुकांची गर्दीपण सगळीकडे येते; त्यामुळे इच्छुकांची ही गर्दी टाळण्यासाठी मी अजूनही जास्त बाहेर पडत नाही, अशी कोपरखळी यावेळी ना.श्रीमंत रामराजे यांनी मारली.

इतरांना अनुकरणीय असे फलटण शहर घडेल : आ.दीपक चव्हाण

फलटण शहरातील जुन्या वास्तूंची पुन:स्थापना टप्प्याटप्प्याने होणार आहे. शहराची स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. पिण्याच्या पाण्याच्या प्रश्‍न, भुयारी गटार योजनेच्या माध्यमातून आरोग्याचा प्रश्‍न सोडवण्यात ना.श्रीमंत रामराजे यांच्या नेतृत्त्वाखाली यश आले आहे. फलटण शहर स्वच्छ व सुंदर बनवून आदर्श शहर बनवण्यासाठी ना.श्रीमंत रामराजे यांनी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करुन दिलेला आहे. येत्या काही वर्षात इतर शहरांनी अनुकरण करावे असे फलटण शहर घडणार आहे, असा विश्‍वास आमदार दीपक चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रारंभी शंकर मार्केट येथील ‘मंडई गणपती’ची आरती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते पार पडली. तद्नंतर लोकमान्य टिळकांच्या पुतण्याचे अनावरण ना.श्रीमंत रामराजे यांच्या हस्ते दिमाखात संपन्न झाले. ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांनी लिहिलेले विशेष मानपत्र देवून ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा सत्कार यावेळी प्रभागातील नागरिकांच्यावतीने संपन्न झाला. नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर व सौ.प्रगतीताई कापसे यांचाही मानपत्र देवून ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविंद्र बेडकिहाळ यांनी केले. सूत्रसंचालन प्रमोद रणवरे यांनी केले तर आभार नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर व सौ. प्रगती कापसे यांनी मानले.

कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, प्रभागातील नागरिक उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!