दैनिक स्थैर्य । दि.२४ जानेवारी २०२२ । फलटण । फलटण तालुक्यातील महत्वाची समजली जाणार्या आदर्की गावासह पंचक्रोशीचा सर्वांगीण विकास माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून आगामी काळामध्ये करणार असल्याची ग्वाही सातारा जिल्हा परिषदेच्या सदस्या ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी दिली.
माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विविध विकासकामांच्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्याचा भूमिपूजन समारंभ सातारा जिल्हा परिषदेच्या सदस्या ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर बोलत होत्या. यावेळी स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर, बांधकाम अभियंता श्री पात्रेकर, ग्रामसेवक श्री अहिरेकर, ठेकेदार रणजित शिंदे, संतोष कुंभार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
आदर्की गावासह पंचक्रोशीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली तरुणांचे संघटन तयार होत आहे. आगामी काळामध्ये आदर्की गावासह पंचक्रोशीमध्ये कोणत्याही प्रकारचा विकासाचा निधी कमी पडू दिला जाणार नाही. आदर्कीवर आमचे विशेष लक्ष असून गावातील ग्रामस्थांना पूर्णपणे सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी दिले.