पर्यटनाच्या दृष्टीने अकोले तालुक्याचा विकास करणार – खासदार शरद पवार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, शिर्डी, दि.२४ : अकोले तालुक्याचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यात येईल. यासाठी लोकप्रतिनिधींनी पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि विकास कामांमध्ये स्थानिकांना सहभागी करुने घ्यावे, असे प्रतिपादन खासदार शदर पवार यांनी आज शेंडी (भंडारदरा) येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात केले.

अकोल्याचे माजी आमदार कै.यशवंतराव भांगरे यांच्या 39व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शेंडी (भंडारदरा) येथे खासदार शरद पवार यांच्याहस्ते झाले. यावेळी ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, आदिवासी विकास व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले, आमदार डॉ.किरण लहामटे, माणिकराव कोकाटे, माजी आमदार गोटीरामजी पवार, अशोक भांगरे, अमित भांगरे उपस्थित होते. पुतळा अनावरणानंतर आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यास खासदार शरद पवार यांनी मार्गदर्शन केले.

शेतकरी मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना शदर पवार म्हणाले, यशवंतराव भांगरे विधीमंडळातील माझे ज्येष्ठ सहकारी होते. सर्वसामान्यांशी आणि शेतकऱ्यांशी  त्यांची बांधिलकी होती. दूध संघ, शैक्षणिक संस्था, साखर कारखान्याचे संचालक या माध्यमातून त्यांनी परिसराचा विकास घडवून आणण्याचे कार्य केले. आदिवासी बांधव, शेतकरी तसेच कारखाने, धरण बांधकाम, पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. जिल्ह्याच्या पाण्याच्या प्रश्नाशी त्यांची बांधिलकी होती. या सर्व कामांमधे जनतेचाही त्यांना सक्रिय पाठिंबा होता.

लोकप्रतिनिधींनी जनतेला विकास कामे पूर्ण करण्याचा दिलेला शब्द वचन म्हणून पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. अकोले तालुका व भंडारदरा परिसर मला खूप आवडतो, पर्यटनाच्यादृष्टीने अकोले तालुक्याचा विकास करणार असल्याचे आश्वासन शदर पवार यानी यावेळी दिले. पर्यावरण संरक्षण आणि स्थानिकांमध्ये समन्वय ठेवतानाच, सुविधा देतांना स्थानिकांकडे दुर्लक्ष न करण्याची सूचना त्यांनी केली. आदिवासीबहुल अकोले तालुक्याकडे लोकप्रतिनिधींनी अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे असे ते म्हणाले. यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येईल. अगस्ती सहकारी साखर कारखान्यावर मोठ्या प्रमाणावर कर्ज थकले असून कारखान्याचे अन्य प्रश्न निर्माण झाले आहेत. साखर कारखाना व्यवस्थापनात देशपातळीवर नामांकित असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटच्या माध्यमातून कारखाना पुनर्रचनेची आणि विकासासाठी  आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल असेही ते यावेळी म्हणाले.

पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, आदिवासीबहुल अकोले भागाच्या विकासासाठी कै.यशवंतराव भांगरे यांनी मोलाचे कार्य केले आहे. त्यांची उभी हयात त्यांनी या भागाच्या विकासासाठी घालवली.  या परिसराचा जो विकास झाला आहे तो त्यांच्यामुळेच. परिसरातील रस्त्यांचा विकास आणि अन्य विकास कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.

 

भंडारदऱ्याच्या पश्चित भागात पाण्याचा दुष्काळ आहे. त्यासोबतच आदिवासी बांधवांसाठी उपजिल्हा रुग्णालय द्यावे, रस्त्यांची कामे करतानाच औद्योगिक वसाहत उभारावी अशी मागणी आमदार डॉ.किरण लहामटे यांनी केले. बंद पडलेल्या उपसा जलसिंचन योजना पुर्नजिवित करणे, शेतीला पुरेसे पाणी मिळावे, युवकांना रोजगार, पर्यटकांना सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी अशोक भांगरे यांनी केली. मेळाव्यास परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!