रस्त्यावर सैन्य तैनात करेन – डोनाल्ड ट्रम्प

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, दि. 02 : अमेरिकेत सध्या मोठया प्रमाणावर तणाव आहे. जॉर्ज फ्लॉयड या आफ्रिकन वंशाच्या नागरिकाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यापासून देशभर सर्वत्र हिंसक विरोध प्रदर्शन सुरु आहे. अमेरिकेतल्या वेगवेगळया राज्यांमध्ये सुरु असलेला हा हिंसाचार थांबला नाही, तर सैन्य तैनात करण्याचा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी राज्यांच्या गव्हर्नर्सना दिला आहे. असोसिएटेड प्रेसने हे वृत्त दिले आहे.

सध्या संपूर्ण जग करोना व्हायरसच्या संकटाचा सामना करतेय. अमेरिकेतही अत्यंत भयंकर परिस्थिती आहे. तिथेही लाखो लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे. पण या परिस्थितीतही अमेरिकेत मोठया प्रमाणावर हिंसाचार सुरु आहे. राज्यांनी हिंसाचार रोखला नाही, तर नागरिकांचे अधिकार, संपत्ती आणि जीवाच्या रक्षणासाठी सैन्य तैनात करेन असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.

“राज्याच्या गव्हर्नर्सनी पुरेशा प्रमाणांत रस्त्यावर नॅशनल गार्डर्सची तैनाती केली नाही, तर तात्काळ स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अमेरिकेचे लष्कर पाचारण करेल” असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

व्हाइट हाऊसजवळ पोलिसांनी झाडल्या रबरी गोळया 
दरम्यान सोमवारी व्हाईट हाऊसजवळ शांततेत निदर्शने करणाऱ्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांडया फोडल्या व रबरी गोळया झाडल्या. अमेरिकेत सुरु असलेला हा हिंसाचार थांबवण्यासाठी मोठया प्रमाणावर बळाचा वापर करण्याचा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला.

अमेरिकेतील मोठया शहरांमध्ये मागच्या सहा दिवसांपासून रात्रीच्यावेळी लुटमार आणि हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. हे सर्व थांबवण्याचा निश्चय ट्रम्प यांनी बोलून दाखवला आहे. ट्रम्प यांना सोमवारी व्हाइट हाऊसजवळ असणाऱ्या सेंट जॉन चर्चमध्ये जायचे होते. तिथे जाण्याचा त्यांचा मार्ग मोकळा करण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर कारवाई केली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!