स्थैर्य, अमरावती, दि. ३: खादी ही देशाची संस्कृती आहे. स्वातंत्र्य लढ्यात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या खादीचा विकास होणे गरजेचे आहे. यासाठी खादीची उत्पादने विपणनासाठी संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते आज येथील एमआयडीसीतील सामूहिक सुविधा केंद्रात खादी महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी प्रदिप चेचेरे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उदय पुरी, समितीच्या अध्यक्ष रूपाली खडसे, सचिव प्रणिता किडीले, उपाध्यक्ष कल्पना शेंडोकार, प्रकल्प व्यवस्थापक नेत्रदिप चौधरी आदी उपस्थित होते.
श्रीमती ठाकूर म्हणाल्या, खादीच्या विविध उत्पादनासोबतच विपणन क्षेत्रावर लक्ष देणे गरजेचे आहे. आरोग्य, पोलिस विभागासह विविध शासकीय कार्यालयात केल्या जाणाऱ्या खरेदीमध्ये खादीची उत्पादने खरेदीसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. यासाठी राज्यपातळीवर खादीचे खरेदीदर निश्चित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. जेम पोर्टलवरून शासकीय कार्यालये साहित्य खरेदी करीत असल्यामुळे खादी समितीने या पोर्टलवर उत्पादनांच्या विक्रीची नोंदणी करावी, जेणेकरून या कार्यालयांना खरेदी करणे सुकर होईल. खादी प्रक्रिया उद्योगामध्ये प्रामुख्याने महिलांना रोजगार देण्यात आला आहे. त्यामुळे यातून महिला सक्षमीकरण होत असल्याचे श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त कस्तुरबा सोलार खादी महिला समितीतर्फे 2 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान खादी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी केले. सुरवातीला श्रीमती ठाकूर यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला सुताचा हार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी चरख्यावर सुतकताई केली. त्यांनी प्रकल्पस्थळी असलेल्या प्रदर्शन आणि प्रकल्पाची पाहणी केली. या महोत्सवादरम्यान प्रदर्शनात आधुनिक पद्धतीने तयार करण्यात आलेली उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. यात प्रामुख्याने लेडीज शर्ट, साडी, कुर्ता, पैजामा, मास्क, टॉवेल्स, बेडशिट, खादी कुशन कव्हर आदी उत्पादने आहेत. अमरावती येथील जुना बाय पास, एमआयडीसी, ए-25 येथील सामुहीक सुविधा केंद्र येथे सुरू असलेल्या महोत्सवाला नागरिकांनी भेट देऊन खादीची उत्पादने विकत घ्यावीत, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.