
दैनिक स्थैर्य । दि.२४ मार्च २०२२ । सातारा । बोंडारवाडी धरणाचा प्रस्ताव अद्याप राज्य शासनाला पाठविला गेला नाही. या धरण क्षेत्रातील 54 गावांच्या प्रचंड असंतोष आहे. आमच्या मागण्यांचा जिल्हा प्रशासनाने सकारात्मक विचार करून ५ एप्रिलच्या बैठकीत ठोस निर्णय घेतला जावा अन्यथा आमचा सनदशीर मार्गाने संघर्ष सुरूच राहणार असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ भारत पाटणकर यांनी दिला आहे. साताऱ्यात बुधवारी निघालेल्या श्रमिक मुक्ती दलाच्या मोर्चाचे नेतृत्व डॉ भारत पाटणकर यांनी केले . या मोर्चाला डॉ पाटणकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर संबोधित केले.
ते पुढे म्हणाले, ” ग्रामस्थांमध्ये कण्हेर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील ५४ गावांना कण्हेर धरणाच्या सहा टक्के राखीव पाण्यातून बोंडारवाडी गावाजवळ शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचे धरण बांधण्याच्या मागणीचा विचार करून पुढील निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते, .त्यानंतर ३ जानेवारीला जलसंपदा विभागाच्या अहवालाबाबत आवश्यक कागदपत्रांसह आम्ही निवेदन दाखल केले होते, त्यानंतर आज दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही बोंडारवाडी धरणाचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे पाठवण्यात आलेला नाही . त्यामुळे या ५४ गावातील जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालाय. त्यामुळे ५४ गावची जनता शहीद दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयात धडकलेली आहे. शेतीसाठी पाणी मिळणे हा ५४ गावच्या जनतेचा हक्क असून तो मिळेपर्यंत ही जनता आंदोलनाच्या पवित्र्यात कायम राहणार आहे. कन्हेर धरणाच्या वरच्या बाजूला अति पावसाचा प्रदेश असून देखील लोकांना पिण्याचे आणि शेतीला पाणी मिळत नाही. हे धरण बांधून ४२ वर्षे पूर्ण झाले आहेत. ज्या भागात कण्हेर धरणाचे पाणी मिळत नाही. त्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण पद्धतीने बोंडारवाडीचे पाणी आणता येईल. मात्र सरकार याबाबत सकारात्मक निर्णय घेताना दिसत नाही.
कण्हेर धरणाच्या वरच्या बाजूला असणाऱ्या गावांना आतील शेतकऱ्यांना तसेच जनतेला सरकारने टाचायला घासायला लावल्या आहेत. दरम्यान, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी बोंडारवाडी धरणाच्या अनुषंगाने ५ एप्रिल रोजी बैठक बोलावलेले आहे. या बैठकीमध्ये जलसंपदा विभागाने आपला सुस्पष्ट अहवाल बैठकीस सादर करण्याच्या सूचना देखील त्यांनी केलेले आहेत. या बैठकीनंतर शासनाकडे अंतिम प्रस्ताव पाठवला जाईल. या बैठकीत निर्णय झाला नाही तर आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल, असे देखील पाटणकर यांनी स्पष्ट केले.