
स्थैर्य, सातारा, दि.०२: सातारा जिल्ह्यात जंबो हॉस्पिटल येथे करोनामुळे झालेल्या मृत्यूंचे डेथ ऑडिट करणार आहे. तसेच म्युकर मायकोसीसचेही ऑडिट करणार असून जिल्ह्यात त्याचा उपचार सुरु करण्याबाबत तातडीने उपाययोजना करण्यात येणार आहे. त्यासाठी पन्नास बेडचा स्वतंत्र वॉर्ड शिवाय सुसज्ज ऑपरेशन थिएटरची यंत्रणा सातारा जिल्हा रुग्णालयात उभारणार असल्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, होम आयसोलेशन कमी करून गावनिहाय संस्थात्मक विलगीकरण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुभाष चव्हाण, जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे – देवकाते उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले की, कोरोनानंतर नव्याने म्युकर मायकोसीसचेही रुग्ण सापडू लागले आहेत. जिल्ह्यात या आजाराचा शिरकाव झाला असून त्यावर उपचार करण्यासाठी सातारा जिल्ह्यात उपचार केंद्र सुरू करणार आहोत. कमी रोग प्रतिकार शक्तीमुळे हा आजार बळावू शकतो. सध्या या रोगाचे 74 बाधित असून 54 जणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिसर्या लाटेचा संसर्ग लक्षात घेता जिल्हा रुग्णालयात 50 बेडचा स्वतंत्र वॉर्ड 50 बेडचा स्वतंत्र आयसीयू आणि सुसज्ज ऑपरेशन थिएटर उभारण्यात येणार आहे. कोरोनातून बरे झाले तरी प्रतिकार शक्ती क्षीण झाल्यामुळे हा आजार बळावण्याची शक्यता आहे. सध्या स्टेरॉईड या औषधाचा अतिवापर करण्यात येत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे औषधाचा अतिवापर न करण्याचे आवाहन त्यांनी डॉक्टरांना केले आहे.
करोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी केंद्र शासनाने शासकीय योजनेतून मिळण्याच्या दृष्टीकोनातून कार्यवाही करणार असून त्यासाठी सर्व्हे करण्यात येणार आहे. करोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या नावाबाबत गोपनियता ठेवून प्रशासनाकडे त्यांची माहिती उपलब्ध झाल्यास योग्य ती मदत शासनाच्या माध्यमातून करता येईल, असेही ते म्हणाले. तसेच दोन्ही पालकांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या घरी भेट देवून त्यांचा सांभाळ करणारे कोणी नसेल तर त्यांना बालसंगोपन केंद्रात दाखल करून त्यांच्या संगोपनाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट, बेड ऑक्युपेशन, डेथ रेट याचा विचार करून जिल्ह्याचे तीन गटात वर्गीकरण करण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्यात दहा ते वीसच्या दरम्यान आहे. त्यानुसार जिल्हा दुसर्या गटात येतो. त्यानुसार सातारा जिल्ह्यात निर्बंध कडक करण्यात येत आहेत.
कोरोना टेस्टिंग करणार्या जिल्ह्यातील लॅबनी तपासणीचे अहवाल 24 तासाच्या आत आपल्या कार्यक्षेत्रातील शासकीय यंत्रणेस (तालुका आरोग्य अधिकारी) ईमेल किंवा व्हॉटसअपद्वारे कळविणे बंधनकारक आहे. हा नियम न पाळणार्या लॅबची मान्यता रद्द करणार असल्याच्या थेट सूचना जिल्हाधिकार्यांनी दिल्या.
वाढत्या रुग्णसंख्येमुळे नवीन रुग्णांचे निदान लवकर होणे गरजेचे आहे. त्यामुळे योग्य उपचार वेळेत होऊन मृत्युच्या संख्येत घट होण्यासाठी रॅट टेस्टिंग तसेच आरटीपीसीआर टेस्टिंगची भूमिका महत्त्वाची असणार आहे. यादृष्टीने टेस्टिंग करण्यात आलेल्या पॉझिटिव्ह व निगेटिव्ह अशा सर्व रुग्णांची नोंद ऑनलाइन पोर्टलवर तात्काळ भरण्यात यावी. जेणेकरुन मिळणार्या अहवालावरुन योग्य ती उपचारात्मक व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनास मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
नियम न पाळणार्या लॅबचा परवाना रद्द करणार
संशयित रुग्णांचा नमुना तपासणीसाठी घेतल्यानंतर ऑनलाइन पोर्टलवर नोंद करताना आरटीपीसीआर चाचणीसाठी नमुना घेते वेळेस एसआरएफ आयडीवर त्याचा संपूर्ण पत्ता सध्या वास्तव्य करीत असलेला (जिल्ह्याबाहेरील असेल तर) किंवा आधारकार्डवर असलेला पत्ता प्रमाणित करुन नमूद करण्यात यावा. संपूर्ण पत्ता नमूद केला तरच पॉझिटिव्ह रुग्णाचा व संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन उपाययोजना राबविण्यास जिल्हा प्रशासनास सोयिस्कर होईल. तसेच रुग्णांचा सुरु असलेला मोबाईल नंबर लिहिण्यात यावा तसेच मिस्ड कॉल देऊन प्रत्यक्ष रुग्णाचा मोबाईल नंबर आहे का याची खात्री करुन घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.
पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णाचा अहवाल देतेवेळी ऑनलाईन पोर्टलवर नोंद करुन आयसीएमआर नंबरसहित तात्काळ देण्यात यावा. फॅसेलिटी अॅपमध्ये ऑटकम अपडेशन (डिस्चार्ज, डेथ, रेफर) करत्यावेळेस आसीएमआर नंबरशिवाय अपडेट करता येत नाही, याची नोंद घ्यावी. तसेच रुग्णांचा अहवाल देतेवेळेस ज्या नावाने आपल्या चाचणी केंद्रास परवानगी दिलेली आहे, त्याच लेटर हेडवर संबंधितास अहवाल देण्यात यावा.
क्लाऊड पॅथॉलॉजी तंत्राचा वापर करण्याचे आवाहन
शक्य झाल्यास त्यांचा नमुना तपासणीचा अहवाल मोबाईलवर अॅटोमॅटिक मॅसेज जाण्यासाठी क्लाऊड पॅथॉलॉजी या सॉफ्टवेअरचा वापर करावा. या सर्व सूचनांचे अत्यंत काटेकोरपणे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे. अन्यथा लॅबची मान्यता पूर्णपणे रद्द करण्यात येईल . असा प्रकार जो फलटण मध्ये झाला त्या तीन लॅबची माहिती अपडेट झाल्यानंतर त्यांचे परवाने निलंबित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली .
जिल्ह्याची आरोग्य सुविधा
1 . तिसर्या लाटेचा धोका ओळखून लहान मुलांसाठी स्वतंत्र टास्क फोर्स
2 . जंबोतील डेथ ऑडिट जिल्हा शल्यचिकित्सक करणार
3 .कॉन्टॅक्ट ट्रेसिंग गतिमान करणार
4 . राष्ट्रीय कुटुंब कल्याणाचा कुटुंबप्रमुख गमावलेल्या परिवारांना लाभ देणार
5 . गावपातळीवर इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनची सोय
6 . जिल्ह्यात सात ठिकाणी ऑक्सीजन प्लँटला गती
7 . स्वतंत्र महिला हॉस्पिटलला गती – 50 ऑक्सीजन बेडची उपलब्धता
8 . खंडाळा, फलटण, माण ,खटाव, कराड, येथे दीडशे बेडची स्वतंत्र हॉस्पिटल