शाळाबाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवाहात आणणार – शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि. १६: ज्यातील शाळा दरवर्षी सर्वसाधारणपणे १५ जूनला तर विदर्भात २६ जूनपासून सुरु होतात. त्याप्रमाणे राज्यातील काही शाळांची ऑनलाईन सुरुवात झाली असून सर्व विद्यार्थ्यांचे नवीन शैक्षणिक वर्षात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्वागत केले आहे. विद्यार्थ्यांसाठी पहिले पंधरा दिवस आणि पुढील एक महिन्यात मागील वर्षीच्या अभ्यासक्रमाची उजळणी वर्ग घेण्यात येणार असल्याची माहिती प्रा. गायकवाड यांनी दिली आहे.

शिक्षणमंत्री प्रा.गायकवाड म्हणाल्या, कोरोनामुळे शाळा सुरु करतांना मागील वर्षीप्रमाणे या वर्षीही ऑनलाईन शिक्षण सुरु केले आहे. गेल्या वर्षी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला गेला. व्हॉट्सअप, युट्युब या सोबतच दूरदर्शन आणि इतर माध्यमांचा वापर करुन शिक्षण देण्यात आले. यासाठी शिक्षकांसह विद्यार्थी मित्र व इतर विविध उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षण उपलब्ध करून दिले.

या वर्षी ब्रीज कोर्सची सोय उपलब्ध केली आहे. यात दहावीच्या विद्यार्थ्याला नववीचा अभ्यासक्रम शिकून सत्र दहावीसाठी लागणारा पाया मजबूत केला जाणार आहे. ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु करतांना विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नयेत यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कोरोना कालावधीत अनेक कारणांमुळे शाळा सुटलेल्या शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण सुरु असून त्यांना परत शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन कार्यरत असल्याचेही प्रा.गायकवाड यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि त्यांची सुरक्षितता यालाच प्राधान्य देऊन आरोग्य विभागाच्या समन्वयाने येणाऱ्या काळामध्ये परिस्थिती बघून शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. असे सांगुन प्रा.गायकवाड यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!