कोरेगाव तालुक्यात रानगव्यांचा वावर; ग्रामस्थांसह शेतकरी हवालदिल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १३ जुलै २०२१ । कोरेगाव । कोरेगाव तालुक्यात गेल्या काही वर्षांमध्ये वनीकरणाच्या क्षेत्रामध्ये झालेल्या वाढीमुळे जंगली श्‍वापदे फिरु लागल्याच्या घटना दिसून येत आहेत. आजवर तालुक्यात वाघ आणि बिबट्याचा वावर माहीत होता, मात्र आता गेले दोन ते तीन दिवस रानगव्यांचा कळप तालुक्यात तळ ठोकून आहे. सातारारोड, जळगाव, भाकरवाडी व ल्हासुर्णे या पट्ट्यात रानगव्यांचा वावर असल्याचे दिसून आले आहे.

भाडळे खोर्‍यात गेले काही वर्षे वाघाचा वावर असल्याचे दिसून आले होते. वन विभागाने त्यांच्या पायाचे ठसे घेतले होते. त्यानंतर गस्त वाढवण्यात आली होती. कालांतराने वाघ परिसर सोडून निघून गेला होता. सध्या सातारारोड, जळगाव, भाकरवाडी व ल्हासुर्णे या पट्ट्यात रानगवे फिरत असताना दिसून आले आहेत. शनिवारी रात्री ल्हासुर्णे परिसरात रानगव्यांचा कळप होता, रविवारपासून तो जळगाव-सातारारोड परिसरात फिरत आहे, पहाटेच्या सुमारास फिरणार्यांना हा कळप दिसला आहे.

सध्या पावसाने ओढ दिली असली तरी अनेकांनी धुळवाफेवर पेरण्या उरकून घेतल्या असून अनेक शेतकरी कुटुंबे दिवसभर शेतात असतात, त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे. वन विभागाने रानगव्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी जळगाव येथील शेतकरी सुनील कृष्णात जाधव यांनी केली आहे. जाधव यांची शेती जरंडेश्‍वर डोंगराच्या पायथ्याशी आहे, तेथे रानगव्यांच्या भीतीमुळे शेतमजूर जाण्यास घाबरत आहेत, असेही जाधव यांचे म्हणणे आहे.


Back to top button
Don`t copy text!