
फलटण तालुक्यातील विडणी (कोकरेवाडी) येथे आळंदी-पंढरपूर महामार्गावर एका ६५ वर्षीय शेतकऱ्यावर रानगव्याने प्राणघातक हल्ला केला. या घटनेत राजाराम जाधव गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बारामती येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान, वनविभागाला या रानगव्याला पकडण्यात यश आले आहे.
स्थैर्य, फलटण, दि. २८ फेब्रुवारी : आळंदी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील विडणी (ता. फलटण) हद्दीतील कोकरेवाडी येथे आज (शनिवारी) सकाळी एका भरकटलेल्या रानगव्याने (Indian Bison) एका वृद्ध शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या भयंकर हल्ल्यात रानगव्याने आपली टोकदार शिंगे शेतकऱ्याच्या पोटात खोलवर खुपसल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर बारामती येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. सुदैवाने, या आक्रमक रानगव्याला पकडण्यात वनविभागाच्या रेस्क्यू पथकाला मोठे यश आले आहे.
राजाराम सदाशिव जाधव (वय ६५, रा. विडणी, ता. फलटण) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
असा घडला थरार…
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास कोकरेवाडी (विडणी) या ठिकाणी महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर शेतातून अचानक एक धिप्पाड रानगवा बाहेर आला. याच वेळी राजाराम जाधव हे आपल्या घरातून सायकलवरून महामार्गावरील सर्व्हिस रोडवरून विडणी गावाकडे निघाले होते. रस्त्यावर अचानक एवढा मोठा रानगवा समोर दिसल्याने ते प्रचंड घाबरले आणि सायकल टाकून जीव वाचवण्यासाठी धावू लागले.
मात्र, आक्रमक झालेल्या रानगव्याने त्यांचा पाठलाग करून त्यांना दोनदा जोराची धडक दिली. इतकेच नाही, तर आपली टोकदार शिंगे जाधव यांच्या पोटात खोलवर घुसवून त्यांना महामार्गालगतच्या शेतात भिरकावून दिले.
बारामतीला हलवले; प्रकृती चिंताजनक
या भीषण हल्ल्यात राजाराम जाधव हे रक्ताच्या थारोळ्यात पडून गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी फलटण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रानगव्याची शिंगे पोटात खूप खोलवर घुसल्याने आणि जखम अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याने, फलटणमध्ये त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारांसाठी तातडीने बारामती येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
बागायत पट्ट्यात भीतीचे वातावरण
विडणी आणि परिसरातील या भागात यापूर्वी कधीही जंगली रानगवा पाहायला मिळाला नव्हता. अचानक झालेल्या या रानगव्याच्या दर्शनाने आणि त्याने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे विडणी परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विडणी हे बागायत क्षेत्र असल्याने, या घटनेनंतर शेतात काम करण्यासाठी जाणाऱ्या शेतमजुरांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये मोठी दहशत पसरली आहे.
वनविभागाचे ‘रेस्क्यू ऑपरेशन’ यशस्वी
घटनेची माहिती मिळताच फलटण वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. रानगव्याला जेरबंद करण्यासाठी फलटण आणि बारामती येथून ‘रेस्क्यू पथक’ (Rescue Team) पाचारण करण्यात आले होते. या पथकाने अत्यंत शिताफीने या रानगव्याचा शोध घेऊन त्याला सुरक्षितरीत्या जेरबंद केले असून, आता त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार आहे.
“हुसकावण्याचा प्रयत्न करू नका; जखमीला मदत करणार” : वनपरिक्षेत्र अधिकारी
या घटनेबाबत माहिती देताना वनपरिक्षेत्र अधिकारी (RFO) निकिता बोटकर म्हणाल्या, “रानगवा हा अत्यंत ताकदवान आणि जंगली प्राणी आहे. लोकांनी त्याला पाहिल्यास स्वतःहून हुसकावून लावण्याचा किंवा डिवचण्याचा अजिबात प्रयत्न करू नये, तसे केल्यास तो बिथरून हल्ला करू शकतो. आमच्या पथकाने या रानगव्याला रेस्क्यू केले आहे. तसेच, या हल्ल्यात जखमी झालेल्या राजाराम जाधव यांना वनविभागामार्फत उपचारासाठी योग्य ती सर्व मदत केली जाईल.”
