स्थैर्य, सातारा, दि 23 : चारित्र्याचा संशय, शारीरिक व मानसिक छळ व माहेरून पन्नास हजार रुपये आणण्याची मागणी या पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. तापोळा विभागातील हरचंद (मोरेवाडी ता. महाबळेश्वर) येथील वर्षा देवानंद मोरे (वय 28) असे विवाहितेचे नाव आहे. यासंदर्भात संशयित आरोपी पती देवानंद लक्ष्मण मोरे याला पोलिसांनी अटक केली आहे.
यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार वर्षांपूर्वी देवानंद मोरे याच्या बरोबर विवाह झालेली वर्षा देवानंद मोरे ही घाटकोपर (मुंबई) येथे पतीसमवेत राहण्यास होती. पती देवानंद मोरे हा टॅक्सी ड्रायव्हर होता. लॉकडाऊन सुरू झाले आणि हे दाम्पत्य हरचंद (ता. महाबळेश्वर) या मूळ गावी गेल्या दोन ते अडीच महिन्यापासून राहण्यास आले होते. विवाहिता वर्षा मोरे हिचा मानसिक आणि शारीरिक छळ मुंबई येथेही सुरू होता. तिला चारित्र्याच्या संशयावरुन तिचा पती सतत मारहाण करत होता व माहेरून 50 हजार रुपये मागणीचा तगादा लावला होता. दरम्यान, लॉकडाऊननंतर पती-पत्नी गावी आले. त्यानंतरही वर्षाला मारहाण व जाचहाट सुरू होता. या सर्व मारहाण व जाचहाटाला कंटाळत वर्षा मोरे हिने राहत्या घरामध्ये विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.
या संदर्भातली फिर्याद विवाहितेचे वडील आनंद शंकर सपकाळ यांनी मेढा पोलीस स्थानकामध्ये दिली आहे. या फिर्यादीवरुन मेढा पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निळकंठ राठोड यांनी घटनास्थळी जाऊन आरोपी देवानंद लक्ष्मण मोरे याला अटक केली आहे. अधिक तपास निळकंठ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष चामे करत आहेत.