काही महिन्यांपूर्वी राज्यात मोठी राजकीय घडामोड घडली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काही आमदारांना घेऊन बंड केलं आणि त्यामुळे राज्यात सत्ता परिवर्तन झाले. यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट सातत्याने एकमेकांवर टीका करताना दिसतात. यातच आता आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी या बंडावर भाष्य केले.
आज महाविकास आघाडीची बैठक पार पडली. यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांसह उद्धव ठाकरे यांनीही भाषण केले. यावेळी त्यांनी शिवसेनेतील बंडावर मोठा खुलासा केला. सूरत-गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना थांबवलं का नाही? याचे कारण त्यांनी सांगितले. ‘मला अनेकदा विचारतात की, तुम्हाला याबाबत आधी माहीत नव्हतं का? तुम्ही त्यांना थांबवलं का नाही? त्यांना कशाला थांबवू, लोक येतात-जातात.’
‘ही माणसं विकली गेली आहेत, त्यांना सोबत घेऊन लढाई कशी लढायची. ज्यांना थांबायचे त्यांनी थांबावे, नाहीतर गेट आऊट. दरवाजा उघडा आहे. मी त्यांना कशाला थांबवू. ते शिवसैनिक होण्याच्या लायकीचे नाहीत, मला विकाऊ माणसे नकोत. कुणी सांगेल तशीच भूमिका घ्यायची, इतका लाचार मी कधीच झालो नाही,’ अशी टीका उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला.
जुन्या पेन्शनवरुन टीका
याआधी उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना जुन्या पेन्शनवरही भाष्य केले. शेतकऱ्यांचे हाल सुरू आहेत, कर्मचाऱ्यांचा पेन्शनसाठी संप सुरू आहे, पण हे सरकार दिल्लीश्वरांची मर्जी राखण्यात व्यस्त आहे. शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईकडे निघाला आहे. बळीराजा आक्रोश करत असताना सरकारला त्यांच्यासाठी वेळ नाही. मुंबईतील व्यवसाय आणि कार्यालय हे दुसऱ्या राज्यात जात आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
जुनी पेन्शन योजना लागू करायला हवी, आमचा त्यासाठी पाठिंबा आहे, केंद्राची शक्ती पाठीमागे असताना योजनेला काय समस्या आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तर अडवाणींच्या काळात ही योजना रद्द करण्यात आली असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, पंचामृत योजनेचा अर्थ हा हे सरकार कुणाला पोटभर मिळणार नाही, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.