स्थैर्य, चेन्नई, दि.१३: कोरोना महासाथ आणि लॉकडाऊनमुळे देशात बेरोजगारीचे प्रमाण
वाढलेले असताना आणि अर्धा देश उपाशी असताना नव्या संसद भवनासारख्या खर्चिक
प्रकल्पांचा अट्टाहास कशाला; असा सवाल ज्येष्ठ अभेनेते आणि मक्कल निधी
मय्यम पक्षाचे संस्थापक कमल हसन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला
आहे.
पंतप्रधान मोदी यांनी दि. १० डिसेंबर रोजी नव्या संसद भवनाची
कोनशिला बसवली. नवे संसद भवन हा २० हजार कोटी रुपये खर्चाच्या सेंट्रल
विस्टा प्रकल्पाचा एक भाग आहे. या प्रकल्पात राष्ट्रपती भवनापासून इंडिया
गेटपर्यंत १३. ४ किमी राजपथावरील सर्व शासकीय इमारतींचे नूतनीकरण किंवा
पुन्हा नव्याने उभारणी केली जाणार आहे.
कोरोनामुळे लोकांचे रोजगार गेले आहेत.
देशातील अर्धी जनता दोन वेळचे अन्न मिळवू शकत नाही. असे
असताना नव्या संसद भावनासाठी १ हजार कोटींचा खर्च कशाला; असा सवाल करणारे
ट्विट कमल हसन यांनी केले आहे. चीनची जगप्रसिद्ध भिंत उभारताना हजारो
लोकांचा मृत्यू झाला. मात्र, ही भिंत लोकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक आहे,
असे त्यावेळी सांगण्यात आले. नवे संसद भवन कोणाच्या सुरक्षेसाठी उभारण्यात
येत आहे, याचे उत्तर पंतप्रधानांनी द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.