फलटणमध्ये का करावे लागले पुन्हा प्रतिबंधीत क्षेत्र?

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. ०९: फलटण तालुक्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्‍वभूमीवर दिनांक 2 मे ते 8 मे या कालावधीत फलटण शहरासह रुग्णसंख्या अधिक असलेला तालुक्यातील ग्रामीण भाग प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला होता. आठ दिवसांच्या या निर्बधांनंतर पुन्हा पुढच्या आठ दिवसांसाठी संपूर्ण फलटण शहर व तालुक्यातील कोळकी, फरांदवाडी, विडणी, साखरवाडी, वाखरी, तरडगाव, वाठार निंबाळकर, जाधववाडी ही आठ गावे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून प्रशासनाने जाहीर केली आहेत. अखेर प्रशासनाला इतकी कठोर पाऊले का उचलावी लागत आहेत? का फलटण शहर व ग्रामीण भागात प्रतिबंधीत क्षेत्र जाहीर करावे लागत आहे? याचे एकमेव उत्तर आहे ते म्हणजे कोरोनाची वाढती साखळी.

शासनाचे विविध निर्बंध जाहीर झाल्यानंतर वास्तविक कोरोना रुग्णसंख्ये काही अंशी तरी घट होणे अपेक्षित होते. मात्र अद्याप तसे चित्र दिसत नसून फलटण तालुक्यात रोज तीनशे ते चारशे जण बाधित होत आहेत. त्यामुळे अर्थातच आरोग्य यंत्रणेवर ताण वाढत आहे. गेल्या चार दिवसांतील फलटण शहरातील रुग्णसंख्या पाहिली तर दिनांक 4 मे रोजी 42, 5 मे रोजी 36, 6 मे रोजी 54 तर 7 मे रोजी 58 जणांना बाधा झाल्याचे तपासणीअंती निष्पन्न झाले आहे. फलटण शहरातील लक्ष्मीनगर, रिंगरोड, शिवाजीनगर, बुधवार पेठ, तेली गल्ली, खाटीक गल्ली, कसबा पेठ, कुंभार गल्ली, रविवार पेठ, मंगळवार पेठ, सगुणामातनगर, महतपुरा पेठ, काळुबाई नगर, कुंभार भट्टी, धनगरवाडा, हाडको कॉलनी, विद्यानगर, समर्थनगर, स्वामी विवेकानंद नगर, भडकमकर नगर, दत्तनगर, शुक्रवार पेठ, जिंती नाका या परिसरांतून हे रुग्ण आढळले असून एकूणच संपूर्ण शहराला कोरोनाने वेढले आहे. कोरोनाच्या संक्रमणाचा वेग जास्त असून एका संक्रमित रुग्णाकडून अन्य व्यक्तीस झपाट्याने बाधा होत आहे. त्यामुळे संपूर्ण फलटण शहर प्रतिबंधीत क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे.

तालुक्यातील ज्या आठ गावांमध्ये हेच आदेश जारी करण्यात आले आहेत त्या ठिकाणीही रुग्ण संख्या कमी झालेली नाही. अनुक्रमे दि.4 मे दि.7 मे दरम्यानची गावनिहाय आकडेवारी – कोळकी 6,17,15,11. फरांदवाडी 3,1,2,0. विडणी 3,8,12,0. साखरवाडी 4,3,17,7. वाखरी 0,0,14,6. वाठार निंबाळकर 3,4,20,16. तरडगाव 4,12,12,5. जाधववाडी 9,10,6,6. रुग्णसंख्येचा हा रोजचा दर जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत प्रशासनाला निर्बंध कमी करता येणार नाहीत, अशी परिस्थिती आहे.

नागरिकांनी या निर्बंधांचे काटेकोर पालन करुन प्रशासनाला सकारात्मक प्रतिसाद देवून या संकट काळाचा सामना करणे सर्वांच्या हिताचे असणार आहे.


Back to top button
Don`t copy text!