बोंबाळे (भाग्यनागर ) : हद्दीत सुरु असलेल्या खड्डे भरण्याच्या कामात अश्याप्रकारे मातीचा वापर होत आहे. (छाया : समीर तांबोळी) |
स्थैर्य, कातरखटाव, दि.२: मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खटाव तालुक्यातील अनेक रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डा की खड्यात रस्ता असा प्रश्न वाहनधारकांना पडत आहे. यापैकीच मायणी-दहिवडी हा प्रमुख मार्ग आहे. या मार्गावर चार दिवसांपूर्वी कातरखटाव ते तडवळे हद्दीत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खड्डे भरण्याचे काम चालू आहे. या कामामध्ये खडी, मुरुमा ऐवजी चिकट मातीचा वापर होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे बांधकाम विभाग जनतेच्या डोळ्यात धुळफेक करत आहे का ? असा संतप्त सवाल जाणकार व्यक्तीकडून व्यक्त होत आहे.
अति पावसामुळे वडूज-पुसेगांव, वडूज-पुसेसावळी, वडूज-दहिवडी, वडूज-मायणी, मायणी-दहिवडी या सर्वच प्रमुख मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. वडूज शहरातल्या छत्रपती शिवाजी चौक या मध्यवर्ती भागानजीकही मोठमोठे खड्डे आहेत. या खड्याबाबत वृत्तपत्रातून अनेकवेळा आवाज उठविला गेला. मात्र सुस्त प्रशासनाला अद्याप जाग येत नाही. दहिवडी-मायणी या मार्गावरुन या भागाचे लोकप्रतिनिधी आ. जयकुमार गोरे यांचा नित्याचा प्रवास असतो. कदाचित त्यांनीही आग्रह केल्यामुळे या मार्गावर खड्डे बुजवणेच्या कामास प्राधान्य दिले गेले असावे. मात्र हे होत असताना काही ठिकाणी खड्यात चिखलयुक्त माती टाकण्याचा उद्योग सुरु आहे. या ठिकाणच्या कर्मचारी, मजूरांना विचारणा केली असता काहींनी हे खात्याअंतर्गत काम असल्याचे सांगितले. तर काहींच्या म्हणण्यानुसार कुलकर्णी नामक ठेकेदाराचे काम असल्याचे समजते. वास्तविक पाहता खड्डे भरणार्या ठेकेदारांची काही वर्षांची गॅरंटी असल्याचे सांगण्यात येते. मात्र खटाव तालुक्यात दरवर्षी खड्डे भरण्याचा कार्यक्रम सुरु असल्याचे जाणवते. त्यामुळे या खड्यातून नक्की कोणाचे खिसे भरण्याचा उद्योग सुरु आहे. असा सवाल व्यक्त होत आहे. बांधकाम प्रशासनाने खड्डे भरण्याच्या कामात तत्काळ सुधारणा न केल्यास भागातील जनतेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष विजय शिंदे, रा.स.प.चे माजी तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण यांनी दिला आहे.