
दैनिक स्थैर्य । दि.१० मार्च २०२२ । सातारा । छत्रपती शिवरायांच्या विचारांची महती सांगणारे खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या विचारांचा मोठेपणा सांगावा असे असेल तर उदयनराजे कोणी इतिहास तज्ञ आहेत काय ? त्यांच्या विचारांचा मोठेपणा सांगणारे मग लोकसभेला का पराभूत होतात ?आणि मी विधानसभेला कसा निवडून येतो ? असा थेट पलटवार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर केला आहे.
साबळे वाडी तालुका सातारा येथील कार्यक्रमात खासदार उदयनराजे भोसले यांनी अजिंक्यतारा कारखान्यातील भ्रष्टाचार वेळ आल्यानंतर बाहेर काढण्याचा इशारा दिला होता त्यावेळी त्यांनी शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर बरेच आरोप केले त्या आरोपांचा रोखठोक समाचार शिवेंद्रसिंहराजे यांनी आपल्या शैलीमध्ये घेतला.
एका खाजगी वाहिनीला प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, ” खासदार उदयनराजे यांना माझ्या बद्दल मी छत्रपतींच्या विचाराचा आहे का हे ठरवण्याचा अधिकार कोणी दिला आहे ? उदयनराजे थोर विचारवंत आहेत का इतिहासकार आहेत उदयनराजे जर छत्रपतींच्या विचाराने चालणारे आहेत तर त्यांचा लोकसभेत पराभव का झाला ?आणि त्याच विधानसभेच्या निवडणुकीत मी का निवडून आलो ? याचे उत्तर उदयनराजे यांनी द्यावे.
शिवेंद्रसिंहराजे पुढे म्हणाले, “रात्री अपरात्री उशिरा गाड्या फिरवायच्या गाडी मध्ये मोठ्या आवाजात गाणी लावून गावातून फिरायचे ही उदयनराजेंच्या दृष्टीने छत्रपतींचे विचार आहेत का ? आपण जसं यात्रेमध्ये डोंबाऱ्याचा खेळ बघतो तसा उदयनराजे यांच्या वाढदिवसाला देखील एक डोंबाऱ्याचा खेळ आपण बघितला आहे आणि अजिंक्यतारा कारखान्याच्या संदर्भात बोलायला ते आमच्या कारखान्याचे सभासद आहेत का त्यांनी कधी उसाची शेती केली आहे का आमच्या कारखान्यांच्या संचालक अथवा शेतकरी सभासदांनी जर मला यासंदर्भात प्रश्न विचारला तर मी त्यांना उत्तर द्यायला बांधील आहे ज्यांचा आमच्याशी संबंध नाही त्यांनी आम्हाला कोणते प्रश्न विचारायची गरज नाही सत्ताधारी सातारा विकास आघाडी ही सातारा भ्रष्टाचार आघाडी आहे आरोग्य विभागामध्ये जंतुनाशकांची खरेदी ही कोणासाठी होते व कोठून होते सातारा शहरात जंतुनाशके फवारली जातात का ? त्याची किती बिले निघतात याची सर्व सातारकरांनी व पत्रकारांनी माहिती घ्यावी.
सातारा शहरातला ग्रेड सेपरेटर हा केवळ एक पांढरा हत्ती ठरला आहे आधीच साताऱ्यात रस्त्याची अडचण असताना मोठे रस्ते सुद्धा या ग्रेड सेपरेटर च्या निमित्ताने छोटे करून वाहतुकीची कोंडी मध्ये भर घालण्यात ग्रेड सेपरेटर ची मोठी मदत झाली आहे त्यामुळे सातारकरांनी ठरवावे आणि सातारकरांनी काय तो निर्णय घ्यावा असे शेवटी शिवेंद्रराजे यांनी सातारकरांना आवाहन केले.