राजकारणात माणसे बोलतात काय यापेक्षा ते करतात काय, याला अधिक महत्व असते. पण तितकीच गोष्ट राहुल गांधींना उमजलेली नाही. अन्यथा त्यांनी कॉग्रेसचा इतका सत्यानाश कशाला केला असता? राहुल २००९ पासून कॉग्रेसचे प्रमुख महासचिव होते आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीचे वेध लागल्यावर त्यांनाच पक्षाध्यक्ष करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. तुलनाच करायची तर मोदी यांचे राष्ट्रीय राजकारणाच्या क्षितीजावरील आगमन आणि राहुल यांच्याकडे एकहाती कॉग्रेसचे नेतृत्व येण्याचा मुहूर्त जवळपास एकच होता. आणखी एक योगायोग आहे. मोदींना भाजपाने २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत चेहरा किंवा पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून पुढे आणले, त्यावेळी राहुल तुलनेने खुप तरूण होते आणि त्यांनी कॉग्रेसला नेतृत्व देऊन पुन्हा सत्तेत आणल्यावर त्यांची अध्यक्षपदी निवड करण्याचा मुळ बेत होता. त्यांच्याच वयाचे गुजरातचे भाजपा नेते अमित शहांना मोदींनी उत्तरप्रदेश पक्षाचे प्रभारी म्हणून आणलेले होते. ह्यातले साम्य समजून घेतले पाहिजे. आपल्या लोकप्रियतेमुळे मोदींना पक्षाने केंद्राचे नेतृत्व सोपवले असले, तरी त्यांचे विश्वासू अमित शहा गुजरातच्या बाहेर कधी काम केलेले नव्हते. पण त्यांच्या संघटना कौशल्याचा लाभ उठवूनच उत्तरप्रदेश जिंकता येईल, हे मोदींनी ताडले होते. देशातील त्या सर्वात मोठ्या राज्यात शहा भाजपला मोठ्या यशापर्यंत घेऊन गेले, तरच त्यांना राष्ट्रीय राजकारणात पुढे न्यायचे असे बहुधा ठरलेले असावे. म्हणजेच २०१४ ची लोकसभा निवडणूक एकाच वेळी तीन नव्या नेत्यांसाठी सत्वपरिक्षा होती. त्यांची नावे आहेत मोदी, शहा आणि राहुल.
२०१४ च्या आरंभी कॉग्रेसच्या हातात देशाची सत्ता होती. नाव भले युपीए असे असेल, पण सत्ता सर्वतोपरी कॉग्रेस पक्षाच्या हातात केंद्रित झालेली होती. तेव्हा राहुलना अध्यक्षपदी आणायचा बेत निश्चित झालेला होता. म्हणून तर मोदींच्या सामन्याला त्यांचे जयपुर येथे अनावरण करण्यात आले. त्यांच्यासाठी पक्षात उपाध्यक्षपद निर्माण करून तिथे त्यांना बसवण्यात आले. जयपूर अधिवेशनात राहूलनी अतिशय आवेशपुर्ण भाषण देऊन छान सुरूवात केली, असे निदान अनेक पुरोगामी पत्रकार संपादकांचे मत होते आणि त्यांनी किंचीतही न लाजता मोदी व राहुलची तुलना केलेली होती. कारण राहुलचे जयपूरचे भाषण आणि मोदींचे दिल्लीच्या श्रीराम कॉलेजातील भाषण यांची तुलना या पत्रकारांनी केलेली होती. मोदी कसे निष्प्रभ व राहुल कसे प्रेरणादायी आहेत, त्यासंबंधी अशा पत्रकार संपादकांचे लेख ट्वीटच आजही तपासून बघता येतील. साडेसहा वर्षानंतर चित्र एकदम बदलून गेलेले आहे. अवघे जग मोदींचा प्रत्येक शब्द गंभीरपणे घेते आणि राहुल जगासमोर केवळ विदूषक ठरलेले आहेत. हा राहुल गांधींचा पराभव नसून त्या पत्रकारांचा व त्यांच्या आकलनाचा दारूण पराभव आहे. पण मुद्दा तो अजिबात नाही. कारण त्याच दरम्यान भाजपामध्ये नवी मांडणी झालेली होती आणि मोदींनी आपला विश्वासू अमित शहा नामक सहकारी उत्तरप्रदेशात आणून बसवला होता. त्याही नेत्याबद्दल बहुतांश संपादक विश्लेषक किती गाफ़ील होते, त्याची साक्ष लोकसभा निकालांनी दिली. कारण एकट्या उत्तरप्रदेशात ८० पैकी ७३ जागा भाजपाला जिंकून देताना शहांनी आपली न पुसणारी छाप पाडली होती.
मुद्दा इतकाच, की शहा गुजरात सोडून राष्ट्रीय राजकारणात आले ते भाजपाचे फ़क्त उत्तरप्रदेश प्रभारी महासचिव म्हणून. त्या परिक्षेत यशस्वीरित्या उत्तीर्ण झाल्यावर शहांनी लौकरच पक्षाचे अध्यक्षपद मिळवले. मात्र पक्षाला पुन्हा सत्तेत आणण्याचे श्रेय घेऊन पक्षाध्यक्ष होण्याचे राहुल गांधींचे स्वप्न किंवा पक्षाची महत्वाकांक्षी योजना शहांनी पुरती धुळीस मिळवली. योगायोग असा, की दोघांचे वय जवळपास सारखेच आहे. एका बाजूला आपल्या व्यक्तीगत पुण्याई वा कर्तृत्वावर शहांनी इतकी मजल मारली आणि घराण्याची पुर्वपुण्याई पाठीशी असतानाही राहुल पक्षालाच धुळीस मिळवून गेले. हा इतिहास आता सहा वर्षे जुना झालेला आहे. मध्यंतरी राहुल गांधी पक्षाचे अध्यक्ष झाले आणि फ़क्त दिड वर्षात त्यांनी पुन्हा पक्षाला मातीमोल करून दाखवलेले आहे. दरम्यान त्यांच्या मेहनतीमुळे एकाहून एक नामवंत निष्ठावंत व गुणी नेत्यांना कॉग्रेस सोडावी लागलेली आहे आणि अजून तो सिलसिला संपलेला नाही. कालपरवाच कॉग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक झाली. त्यात एकूण पक्षाच्या दुर्दशेबद्दल बोलण्याचा केवळ प्रयत्न केला, म्हणून एका तरूण नेत्याला कानपिचक्या मिळालेल्या आहेत. सतत मोदींना लक्ष्य करणारी टिका अनाठायी व कॉग्रेसलाच घातक ठरत असल्याचे सांगत या नेत्याने भाजपाच्या धोरणावर टिका करावी असे सुचवले होते. तर त्यालाच प्रियंका गांधींनी गप्प केले. राहुलनी तर आपण एकटेच मोदींना लक्ष्य करतो आणि इतर कॉग्रेसनेते मोदींवर चकार शब्द बोलत नाहीत, असा उलटा आरोप केला. मग कार्यकारिणीतील सर्व ज्येष्ठ नेत्यांची बोबडी वळली आणि त्यांनी राहुलच कसे योग्य आहेत, त्यावर शिक्कामोर्तब करून बैठक संपवण्यात आली.
गेल्या पाचसहा वर्षात कॉग्रेसने अशा किती नेत्यांना बाहेरचा रस्ता दाखवला? जयंती नटराजन, ज्योतिरादित्य शिंदे, टॉम वडक्कन आणि आता संजय झा. इतर लहानसहान नेत्यांची तर खिजगणती नाही. अशा त्यांचा गुन्हा नेमका काय होता? त्यांनी पक्षाच्या नेतृत्वाला प्रश्न विचारले. त्यांनी चुकीच्या भूमिका व धोरणामुळे पक्षाची पिछेहाट होतेय, म्हणून आक्षेप नोंदवलेले आहेत. अगदी कालपरवाच रायबरेली येथील कॉग्रेसच्या आमदार आदिती सिंग यांनी प्रियंका गांधी यांनी जो हजार बसेसचा तमाशा केला, त्याविषयी नाराजी व्यक्त करून योगी सरकार उत्तम काम करीत असल्याचे सत्य बोलून दाखवले. म्हणून त्यांची हाकालपट्टी झाली. थोडक्यात सामान्य जनतेशी जोडलेल्या सामान्य कार्यकर्ते व स्थानिक नेत्यांकडून श्रेष्ठींना जी प्रतिक्रीया मिळत असते, ती लाथाडण्याखेरीज काहीच होताना दिसत नाही. पक्षात विचारमंथन नाही आणि ज्यांना जनतेत स्थान नाही, त्यांच्याच हातात पक्ष फ़सलेला आहे, असे एकूण सामान्य कार्यकर्त्याचे मत आहे, तेच व्यक्त करणारा लेख संजय झा यांनी लिहीला होता. त्याचीच शिक्षा म्हणून त्यांची पक्षातून हाकालपट्टी झाली. हे संजय झा नेमके कोण आहेत? आपल्या सफ़ाईदार इंग्रजी भाषेतून त्यांनी मागली पाचसहा वर्ष राहुल गांधींच्या प्रत्येक पोरकट वा खुळचट विधानांना समर्थनीय ठरवण्याची विविध वाहिन्यांवर कसरत केलेली आहे. तर लोकसभेतील पराभवाचे खापर अशाच लोकांवर फ़ोडून राहुलनी आधी सर्व प्रवक्त्यांची हाकालपट्टी केली. त्यांच्या जागी अनधिकृत प्रवक्ते आणलेले आहेत. रवि श्रीवास्तव, निशांत वर्मा, चेतन शर्मा, कोणी मनस्वी, अब्बास असे तथाकथित पत्रकार विश्लेषक आजकाल कॉग्रेसची बाजू हिरीरीने वाहिन्यांवर मांडताना दिसतात. हा काय प्रकार आहे?
चांगली हिंदी वा इंग्रजी बोलता येणे आणि भाजपा व मोदींच्या विरोधात द्वेषपुर्ण भाषेत बोलण्याचे कसब त्यांच्याकडे आहे. पण जिथे मुद्दाच नाही, तिथे वकिली तरी कशी करता येणार? त्यामुळे असे उसनवारीचे प्रवक्ते पोरसवदा युक्तीवाद किंवा खुळचट विधाने करीत असतात. भाजपा मोदींना शिव्या देण्या़चे कर्तव्य त्यांच्याकडून पार पाडले जाते. पण कॉग्रेसची बाजू समर्थपणे मांडली जात नाही किंवा कॉग्रेसकडे काही पर्यायी अजेंडा असल्याचेही मांडले जात नाही. थोडक्यात विरोधासाठी विरोध करणारे शोधून राहुल कॉग्रेसने त्यांच्याकडे पक्षाची लढाई सोपवली आहे. दुसरीकडे भाजपाने आपली प्रवक्त्यांची फ़ौज उभी केली आहे आणि प्रत्येक मंचावर आपली बाजू समर्थपणे मांडली जाईल याची काळजी घेतलेली आहे. संजय झा यांची तीच तक्रार आहे. कॉग्रेसपाशी खंबीरपणे आपली बाजू मांडू शकतील असे नेते व बुद्धीमान लोक आहेत. पण त्यांना गुंडाळून ठेवले गेले आहे. किंवा त्यांनीच स्वेच्छेने बाजूला बसायचे ठरवलेले आहे. कारणही स्पष्ट आहे. त्यांना पक्षाची धोरणे व अजेंडावर समर्थपणे बोलता येईल. पण राहुल यांच्या वेडगळ वक्तव्ये किंवा आरोपांची वकिली करणे अशक्य आहे. त्यातून कॉग्रेसच्या भूमिकेचा प्रसार होणार नाही, पण ते युक्तीवाद मांडणारे अधिकाधिक हास्यास्पद होत जातील. जी स्थिती आजकाल चेतन शर्मा वा निशांत वर्मा यांची आहे. त्यापेक्षा जयराम रमेश सारखे नेते अधिक प्रभावीपणे बोलू शकतील. पण राहुल शहाणे असल्याचे सिद्ध करणे त्यांनाही केवळ अशक्य आहे. किंबहूना राहुल कसे जनतेशी व वास्तवाशी तुटलेले नेतृत्व आहे, त्याची ग्वाही रमेश यांनी २०१३ सालीच दिलेली होती. पुन्हा २०१८ च्या मध्याला त्यांनी ते सांगितलेले होते. पण त्यांना जोडे खाऊन गप्प बसावे लागलेले आहे. कॉग्रेसमध्ये आजकाल शहाण्यासारखे बोलणे वा सांगणे पक्षद्रोह ठरलेला आहे. मग दुसरे काय व्हायचे?
नरेंद्र मोदी हे कॉग्रेस समोरचे स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वात मोठे आव्हान आहे असे रमेश यांनी २०१३ साली एका मुलाखतीतून सांगितले होते. तर सत्यव्रत चतुर्वेदी नामक चमचेगिरी करू शकणार्या नेत्याने रमेश यांच्यावर हल्ला चढवला होता. इतकीच मोदीभक्ती उतू जात असेल तर रमेश यांनी भाजपात जाऊन मोदींचे गोडवे गावेत असली टिप्पणी झाली आणि रमेश थंडावले. त्यांचे शब्द खरे ठरले आणि आज कॉग्रेस नामशेष व्हायच्या कडेलोटावर उभी आहे. गेल्या वर्षी म्हणजे साधारण लोकसभा निवडणुकीपुर्वी रमेश यांनी पुन्हा कॉग्रेसला सावध करण्याचा प्रयास केला होता. राहुल व एकूण गांधी खानदानाच्या चमच्यांचा कान पिरगाळताना जयराम रमेश टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते, बादशाही साम्राज्य कधीच रसातळाला गेले आहे. पण बादशाहीचा मस्तवालपणा अजून संपलेला नाही. त्यांचे शब्द पुन्हा २०१९ च्या लोकसभा निकालांनी खरे ठरवले. पण ऐकायला कोण राजी आहे? सर्व नेते व त्यांचे भाटचमचे पराभवालाच विजय ठरवण्यात गर्क आहेत आणि कॉग्रेसचा दिवसेदिवस र्हास होत चालला आहे. तो कसा व कोणी थांबवायचा इतकाच प्रश्न आहे. मात्र तसा कोणी प्रयत्न केला तरी त्याला बाहेरचा रस्ताच दाखवला जातो. थोडक्यात कॉग्रेसमध्ये रहायचे असेल तर राहुल व प्रियंकाच्या खुळेपणाला शहाणपणा ठरवण्याचे कौशल्य अंगी बाणवता आले पाहिजे. त्यातले दोष व नुकसान दिसत असूनही त्याकडे काणाडोळा करता आला पाहिजे. अन्यथा तुम्हाला आपला मार्ग मोकळा आहे. कॉग्रेस संपवायची आहे आणि त्यात आड येणारा प्रत्येकजण कॉग्रेसचा शत्रू मानला जाईल, हाकलून लावला जाईल.
लेखाच्या आरंभी म्हणून तीन नेत्यांची तुलना केली. त्यापैकी मोदी आता सत्तरीच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. पण आपला वारसा चालवण्यासाठी त्यांनी पक्षात नव्या नेतृत्वाची नवी फ़ळी उभी करण्याला मागल्या सहा वर्षात प्राधान्य दिले आहे. कितीही विश्वासातला व निकटचा सहकारी असूनही अमित शहांना आपल्या गुणवत्तेची परिक्षा देऊनच इथवर यावे लागलेले आहे. राहुल उपाध्यक्ष झाले आणि शहा महासचिव झाले, तो मुहूर्त समान होता. पाठीशी कसलीही पुण्याई नसतानाही शहांनी पक्षाला देशाच्या कानाकोपर्यात नेण्यापर्यंत मजल मारली, उलट राहुलनी त्याच कालखंडात कॉग्रेसची विविध राज्यात खोलवर रुजलेली मुळे उखडून काढण्याचा चमत्कारीक पराक्रम केला आहे. त्यांनी तीनदा आरामात जिंकलेला अमेठीचा वडिलार्जित बालेकिल्ला यावेळी गमावला आणि प्रियंका यांनी रायबरेली अमेठीतल्या एकमेव कॉग्रेस आमदार अदिती सिंग यांनाही पक्षातून हाकलून लावण्याचा पल्ला गाठला आहे. या दोघा वंशजांकडून कॉग्रेस कुठे ढकलली जात आहे, त्याची ही कहाणी सांगायला पुरोगामी पत्रकार तयार नाहीत, म्हणून सत्य बदलत नाही किंवा परिणाम बदलणार नाहीत. अमित शहांनी या काळात पक्षासाठी किती लोक जोडले आणि राहुलनी किती नेते कार्यकर्ते व लोक तोडले? कधीतरी त्याचेही साकल्याने विश्लेषण होण्याची गरज आहे. पत्रकारांनी नुसती दोन पक्षांची आरोपबाजी लोकांना सांगण्याचा चुगलखोरपणा थांबवून वाचकांसमोर राजकारणाचे तुलनात्मक विश्लेषण करायला हवे. तरच देशातील भाजपा ह्या सत्ताधारी पक्षाला पर्याय उभा राहू शकेल. अन्यथा भाजपाचीही कॉग्रेस होऊन जाईल आणि एकपक्षाच्या वर्चस्वाने लोकशाही दुबळी होत असते. माध्यमांनी बुद्धीमंतांनी लोकांना पर्याय द्यायचा नसतो, तर पर्याय उभा करायला प्रवृत्त करायचे असते. म्हणून ही तुलना.