स्थैर्य, कोळकी, दि. २४ : लोकशाहीचा चौथा स्तंभ, लोकशाहीचा आरसा ज्याला दर्पण म्हणतो, त्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभात अनेक निस्वार्थी पत्रकार आपले काम प्रामाणिकपणे करुन सामाजिक समस्यांना वाचा फोडत असताना याक्षेत्रात अनेक लांडग्यांनी धुमाकूळ घातला आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून बिनभांडवली धंदा करणार्यांचा या क्षेत्रात सुळसुळाट झालेला आहे. जेमतेम शिक्षण असणार्यांनी येथे पत्रकारितेची झूल पांघरुण उजळमाथ्याने एखाद्याला निशाणा करुन राजरोसपणे दरोडेखोरी चालवली असून काही ठिकाणी यांच्या टोळ्याच निर्माण झालेल्या आहेत. दिवसागणिक वेगवेगळ्या नावाने अनेक चॅनेल्स येत आहेत. काहींनी तर वेबपोर्टल काही हजारांत तयार करुन देण्याचा धंदा मांडला असून या दरोडेखोरांना कायदेशीर स्वरुप देत आहेत. पत्रकारितेत परंपरेने घालून दिलेली काही तत्त्वं आहेत, या तत्त्वांच्या चौकटीमध्ये काम करणं ही खरंच तारेवरची कसरत असून ज्यांना ज्यांना ही कसरत जमली तो खरा लोकशाहीचा आधार ठरलाय.
अवैध धंदे, गुन्हेगारी वृत्ती, भ्रष्ट व्यवस्था यांच्याविरुद्ध लढणारा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकार. आज तोच हरवला आहे. ही त्याची झाली एक बाजू. काही चांगलेही पत्रकार आहेत, ते त्यांचं कर्तव्य अगदी तंतोतंत, नि:स्वार्थ, वंचितांना न्याय देण्यासाठी, जीवाची पर्वा न करता करत असतात. त्याचं पाऊल जनतेच्या हितासाठीच असतं. असे पत्रकार वगळता काही लोचट प्रवृत्तीचे लोक त्यामध्ये मिसळले आहेत. या तोतयांनी हल्ली तर सोशल मीडियाच्या यू टयूब चैनलच्या आधारे स्वत: पत्रकार असल्याचे भासवून दिशाभूल करण्याचे काम सुरू केले आहे. एकूणच यू टयूब चॅनेल आणि पत्रकारितेचा तीळमात्रही संबंध नाही.सोशल मीडियावर काम करणा-या व्यक्ती या पत्रकार होऊच कशा शकतात. याचा विचार नक्कीच केला पाहिजे. सोशल मीडियावर एखादी व्हीडिओ क्लिप तयार करून त्याचा प्रसार करणे म्हणजे पत्रकारिता करणे नव्हे. एखादा व्यक्ती समाजामध्ये वाईट काम करत असेल व त्याची वाह वाह करण्यासाठी अशा प्रकारचा बनाव करून जनतेची दिशाभूल व फसवणूक करणारा तो लोकशाहीचा चौथा स्तंभ मुळीच नाही. सध्या यू टयूबसारख्या सोशल मीडियाला हाताशी धरून स्वत: रिपोर्टर असल्याचा बनाव करून सर्वसामान्य जनतेला फसवण्याचा धंदा व त्यांची दिशाभूल करण्याचे षडयंत्र काही तोतया पत्रकारांनी मांडला आहे. अशा प्रकारचे सत्य समोर आणण्यासाठी व लढा देण्यासाठी कोणीतरी पाऊल उचलायला हवे. कोणीतरी अशा बनावट तोतया पत्रकारांना जाब विचारायला हवा. त्यांच्याकडे कायदेशीर परवानगी आहे का नाही? याचीही पडताळणी व्हायला हवी व त्यापासून होणारा गैरवापर, जनतेची दिशाभूल थांबवायला हवी. समाजामध्ये अवैध मार्गाने पैसे मिळवणारे काही लोक असतात, त्यांच्याकडे पैसा भरपूर असतो, तो पैसा आपल्याला कसा मिळेल याकडे अनेक तोतयांचा कल असणारे काहीजण पत्रकारितेच्या पवित्र क्षेत्राला काळिमा फासण्याचे काम करत आहेत. हे कुठेतरी थांबले पाहिजे. यासाठी कोणी तरी ठोस पाऊल उचलायला पाहिजे. अशा वृत्तीच्या लोकांनी रचलेले षडयंत्र हाणून पाडले पाहिजे. काल परवा पत्रकारितेचे झूल पांघरुन आलेले हे लोचट तोतया राजरोस खंडणी मागत आहेत. यांच्या या बेधडक दरोडेखोरीला पाठबळ कोणाचे हे शोधणे आवश्यक आहे. राजकारण्यांच्या किंवा आणी कोणाच्या तरी ताटाखालचं मांजर होऊन त्यांच्या तालावर नाचणारे कधीच सफल होत नसतात. भूछत्राप्रमाणे त्यांचा काळ अल्प असतो. तरी पण तेवढयाच काळामध्ये ते अनेकठिकाणी धुमाकूळ घालतात. अनेक प्रामाणिकांचे नुकसान करून जातात. अशा प्रकारचे नुकसान टाळण्यासाठी, ज्यांच्या डोक्यामध्ये लोकशाहीबद्दल आपुलकी आहे, सर्वसामान्यांचा कळवळा आहे, अशांनी अशा प्रकारची अघोरी पत्रकारिता करणा-यांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे.
लोकशाहीचा बुरखा पांघरुण समाजात प्रतिष्ठीत म्हणून मिरवणार्या या दरोडेखोरांचे खरे स्वरुप जनतेला माहित असते अशांनी कितीही प्रतिमा उजळ असल्याचा व सावित्रीचा आव आणला तरी त्याचा काहिही उपयोग नसतो. थोडक्यात म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला देशात एक वेगळे स्थान आहे. त्याची एक वेगळीच ओळख आहे. ती ओळख निर्माण झाली ती त्याच्या कर्तव्यामुळे, तो त्या क्षेत्रात कार्य करत असल्यामुळे, लोकशाहीचा अर्थ आरसा, दर्पण. त्याच्याकडे पाहिलं की अन्याय झालेल्याला न्याय नक्कीच मिळणार आहे याचं समाधान असतं. त्याला मिळणारे समाधान हे पत्रकारितेत कार्यरत असलेल्या स्वच्छ पाण्याप्रमाणे, पारदर्शी कर्तव्य करणा-या पत्रकाराकडून मिळते. पण हल्ली याची व्याख्या काही वेगळी झाली आहे, पत्रकारिता हा व्यवसाय बिनभांडवली धंदा अनेकांनी बनवला असल्यामुळे याकडे गंभीरतेने हे पाहिलं पाहिजे. लोकशाहीचा चौथा स्तंभ हल्ली राजकारण्यांच्या ताटाखालचे मांजर झालाय. तो त्यांच्या पायाभोवती इकडेतिकडे घुटमळत असतो आणि हे सत्य आहे. पत्रकार बातमी लिहितो, त्या बातमीला जिवंतपणा देण्याचं काम करतो, पण वाचक जेव्हा ती बातमी वाचत असतो तेव्हा ती बातमी जिवंत आहे की मेलेली आहे हे एक वाचकच ठरवतो. त्यामुळे वाचकांना अशा उठवळांची लायकी माहित असते. या उठवळांनी कितीही प्रामाणिक आव आणला तरी यांना लोचट कुत्र्याची उपमा दिलेली असते. अर्थात कुत्रे इमानदार असतात पण या प्रवृत्तींनी कुत्र्यांनाही लाजवले असून बदनाम करुन त्याच्या पुढे पाऊल टाकले आहे. जनतेनेच अशा दरोडेखोरांना निर्भिडपणे तक्रार करुन चाप लावल्यास थोडक्यात मलिदा कमविण्यासाठी पत्रकारितेची झूल पांघरुन प्रतिष्ठतेचा आव आणणार्यांना पाठबळ कोणाचे हे ही जनतेसमोर येईल. अशा कलंकित प्रवृत्तींना आळा घालणे आवश्यक नव्हे तर अत्यावश्यक असून मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणार्या या अवलादींना ठेचलेच पाहिजे.
– राजेंद्र पोरे,
संपादक, साप्ताहिक लोकपार्थ एक्सप्रेस