स्थैर्य, सातारा, दि. 15 : दिवसेंदिवस जिल्ह्यात वाढत असलेला कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दि. 17 पासून लॉकडाउनचा निर्णय घेतला. त्यामुळे बुधवारी शहरातील प्रत्येक रस्त्यावर खरेदीसाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. लॉकडाउनचा निर्णय घेताना प्रशासनाने व्यापार्यांचाही विचार घेणे गरजेचे होते, असे मत व्यापारी असोसिएशनचे चेअरमन गुरुप्रसाद सारडा यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले, यापूर्वी जिल्हाधिकार्यांनी 9 ते 5 या वेळेत दुकाने खुली ठेवण्याची मुभा दिली होती. त्यामुळे खरेदीसाठी नागरिकांकडे पुरेसा वेळ होता. परंतु वाढते कोरोना संक्रमण लक्षात घेवून ही वेळ कमी करून 9 ते 2 अशी करण्यात आली. परिणामी वेळ कमी मिळत असल्यामुळे लोकांची खरेदीसाठी झुंबड उडत होती. वेळेनंतरही दुकानाबाहेर लोकांची गर्दी हटत नव्हती. प्रशासकीय नियमामुळे नाइलाजास्तव व्यापार्यांना आपली दुकाने बंद करावी लागत होती. प्रशासन, पोलीस आणि नगरपालिकेच्या समन्वयाच्या अभावामुळेच हे चित्र बाजारात पहावयास मिळत होते. वेळेनंतरही दुकाने उघडी राहिल्यास दुकानाचा व दुकानाबाहेरील ग्राहकांचा पोलीस, नगरपालिकेच्या कर्मचार्यांकडून फोटो काढला जात होता. अशा परिस्थितीमुळे व्यापारी व ग्राहकांचा पूर्ण गोंधळ उडत आहे. जिल्हाधिकार्यांनी दि. 17 पासून जिल्ह्यात पूर्णत: लॉकडाउन जाहीर केल्यामुळे बुधवारी शहरातील रस्त्यांना जत्रेचे स्वरूप आले होते. लोकांनी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी प्रत्येक दुकानापुढे गर्दी केली होती. व्यापार्यांनी आवाहन करूनही लोकांकडून नियमांचे कोणतेच पालन केले जात नव्हते. याचे खापर पोलीस, पालिका कर्मचार्यांकडून दुकानदारांवरच फोडले जात होते. दुकानदारांबरोबरच ग्राहकांनाही त्यांचे फोटो काढून दमदाटी करण्याबरोबरच गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात होती. दुकानदार, व्यापारी कोणी दरोडेखोर अथवा गुन्हेगार नसून त्यांचे प्रशासनाला नेहमीच सहकार्य असते. अशा वेळी प्रशासनाचा व्यापार्यांवर कारवाईचा बडगा उगारणे कितपत योग्य आहे?
वेळ कमी करून प्रशासनाने नेमके काय साध्य केले
प्रशासनाला गर्दी नियंत्रीत करायची होती तर प्रशासनाने पूर्वीची 9 ते 5 या वेळेत कपात न करता तीच वेळ वाढवून 9 ते 7 केली असती तर गर्दी होण्याचा प्रश्नच राहीला नसता आणि आजचे चित्रच दिसले नसते. त्यामुळे प्रशासनाने वेळ कमी करून नेमके साध्य केले काय, असा प्रश्न पडला आहे.
दोनच दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यात लॉकडाउन करताना तेथील प्रशासनाने व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकार्यांशी चर्चा केली. त्यांना विश्वासात घेतल्यामुळे व्यापारी असोसिएशननेही कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पुणे प्रशासनाला सहकार्य करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तेथील चित्र आज वेगळे असल्याचे त्यांनी सांगितले.
व्यापारी असोसिएशनकडून कायमच प्रशासनाला मदत
सातारा व्यापारी असोसिएनशची कायम प्रशासन व पोलिसांना सहकार्याची भूमिका राहिली आहे. यापुढेही कोरोनाच्या उच्चाटनासाठी सहकार्य राहील, असे सांगत ते म्हणाले, की ज्या ज्या वेळी प्रशासन व पोलिसांनी व्यापारी असोसिएशनला मदतीची हाक दिली, त्या त्या वेळी असोसिएशनने मदतीचा हात पुढे केला. यावेळीही कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी आमची सहकार्याची भूमिका असणार आहे. परंतु त्यासाठी प्रशासनानेही व्यापार्यांना विचारात घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे.