
दैनिक स्थैर्य | दि. ४ ऑगस्ट २०२४ | सातारा |
जोरदार पाऊस पडत असल्याने सातार्याच्या पश्चिमेला असलेल्या ठोसेघर पर्यटन स्थळासह इतर ठिकाणचे धबधबे ओसंडून वाहत आहेत. पर्यटनस्थळे बंद असतानाही अनेक अतिउत्साही पर्यटक पर्यटनस्थळी जात आहेत. शनिवारी पुणे येथील काहीजण ठोसेघर धबधबा पाहण्यास गेले असताना बोरणे घाटात असलेल्या मंकी पॉईंटवरून सेल्फी काढताना नसरीन अमीर कुरेशी (वय २९, रा. वारजे, ता. पुणे) ही युवती १०० फूट खोल दरीत पडली. घटनेनंतर होमगार्ड व स्थानिकांच्या मदतीने युवतीला बाहेर काढण्यात आले असून तिच्यावर सातारा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ठोसेघरवरून माघारी येताना बोरणे घाटातील मंकी पॉईंटच्या एका कठड्यावर सायंकाळी ६ च्या सुमारास सेल्फी काढण्यासाठी नसरीन व तिचे मित्र थांबले. सेल्फीच्या नादात नसरीनचा तोल गेला आणि ती १०० फूट खोल दरीत पडली. याचवेळी या मार्गावरुन होमगार्ड अविनाश मांडवे व सागर मदने हे साताराकडे निघाले होते. ही घटना त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी याबाबत ठोसेघर वनसमितीचे प्रवीण चव्हाण, प्रथमेश जानकर, प्रतिक काकडे, रामचंद्र चव्हाण यांना माहिती दिली. त्यानंतर अविनाश मांडवे यांनी जीव धोक्यात घालून दोरीच्या सहाय्याने खोल दरीत उतरुन युवतीला बाहेर काढले. खोल दरीत पडल्याने युवती जखमी झाली असून तिच्यावर सातारा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.