दैनिक स्थैर्य | दि. १३ नोव्हेंबर २०२४ | फलटण | विकास कामांबाबत बारामतीशी फलटणची तुलना करताना बारामतीला राज्याचे मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री पद आणि केंद्रीय मंत्रीपद किती वर्षे आहे आणि त्यासत्तेतून बारामतीला किती निधी मिळाला, त्या तुलनेत फलटणला राज्यातील कोणती महत्वाची पदे किती वर्षे मिळाली आणि त्यातून किती निधी उपलब्ध झाला याचा विचार केल्यावर ही चर्चा केवळ निरर्थक नव्हे गैरलागू असल्याचे स्पष्ट होईल. फलटणच्या विकासाची तुलना करताना आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना मुख्यमंत्री पद द्या आणि मग बघा कसा बदल होतो असा प्रेमाचा सल्ला देत फलटणची बारामतीशी नव्हे सातारा जिल्ह्यातील तालुक्यांशी तुलना केली पाहिजे असे मतही यावेळी खा. मोहिते पाटील यांनी व्यक्त केले.
फलटण – कोरेगाव विधानसभा मतदार संघातील निवडणूक पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, अ. भा. राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना ठाकरे आणि मित्रपक्षांच्या महविकास आघाडीचे उमेदवार दिपकराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ साखरवाडी येथे आयोजित जाहिर प्रचार सभेत खा. मोहिते पाटील बोलत होते, यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, सह्याद्री चिमणराव कदम, नितीन शाहूराज भोसले, भगवानराव होळकर, माजी सभापती शंकरराव माडकर व सौ. रेश्माताई भोसले, राजाभाऊ भोसले, सतीश माने, राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी बेडके, शंभुराज खलाटे, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय भोसले, तालुका प्रमुख विकास नाळे यांच्यासह साखरवाडी व पंच क्रोशीतील मतदार बंधू – भगिनी उपस्थित होते.
१९६०-७० च्या दशकात खाजगीकरणाच्या विरोधात जाऊन यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, दादासाहेब कोरे, शंकरराव मोहिते पाटील, श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर वगैरे जाणकार नेते मंडळींनी पश्चिम महाराष्ट्रात सहकार रुजवला आणि त्यामाध्यमातून कारखानदारी उभी करुन लोकहित साधल्याचे निदर्शनास आणून देत आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी तालुक्यातील बंद पडलेले दोन्ही साखर कारखाने पुन्हा सुरु करुन ऊस उत्पादक, कामगार यांना दिलासा देताना परिसराच्या विकासाची संकल्पना पुन्हा प्रत्यक्षात आणली ही वस्तुस्थिती आहे,आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी हजार कोटींची ही मालमत्ता पन्नास कोटींमध्ये स्वतः विकत तर घेतली नाही ना ? असा सवाल करीत तुम्ही काय केले हे जनतेला माहित असल्याचे खा. धैर्यशील मोहिते पाटील यांनी अजित पवार यांचे नाव न घेता निदर्शनास आणून दिले.
खा. शरद पवार यांच्यावर मोहिते पाटील, नाईक निंबाळकर घराणी व इथल्या सर्वसामान्य जनतेचे प्रेम आहे, म्हणून आम्ही सर्वांनी तुम्हाला एवढे वर्षे सहन केले, विकासाऐवजी केवळ पाय ओढा ओढीचे उद्योग केले आणि आता ते राज्याचे नेते व्हायला निघाले आहेत अशी टीका करुन अदृश्यशक्ती आपल्यामागे आहे, मतदारांनी भूलथापांना बळी पडून कोणतीही चूक करु नये. दिपकराव चव्हाण यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन खा. मोहिते पाटील यांनी केले.
१५ वर्षांपूर्वी आपण सर्वांनी दिपकराव चव्हाण यांना आमदार म्हणून निवडून दिले, त्यानंतर पुन्हा २ वेळा त्यांना विधानसभेत पाठविले मात्र१५ वर्षांपूर्वीचे दिपकराव चव्हाण व आजचे आ. दिपकराव चव्हाण यांच्यामध्ये आपणाला काहीही फरक दिसून येत नाही. सुसंस्कृत व सुशिक्षित आणि जनतेच्या सुख दुःखात समरस होणारा एक लोकप्रतिनिधी आपल्याला त्यांच्या रुपाने मिळाला आहे. विधानसभेमध्ये सर्वात जास्त प्रश्न मांडणारा आमदार या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पाहिले जात असल्याचे निदर्शनास आणून देत असा सदशील, निस्पृह, कामाचा लोकप्रतिनिधी आपल्याला मिळाला ही समाधानाची बाब असल्याचे सांगत त्यांना पुन्हा विधानसभेत पाठविण्याचे आवाहन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
राष्ट्रवादी पक्षामध्ये फूट पाडून राष्ट्रवादीमध्येच भांडण लावण्याचा भाजपचा कावा जनतेने लक्षात घ्यायला हवा असे सांगत श्रीमंत संजीवराजे म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणाचा बट्याबोळ करण्याचा धनी कोण हे लक्षात घेऊन त्यांचा समूळ नायनाट करण्याचे काम आपल्याला दिपकराव चव्हाण यांना निवडून देऊन करायचे असल्याचेही श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आवर्जून सांगितले.