कुठे नेऊन ठेवलाय आचार्य अत्रेंचा महाराष्ट्र ! या विषयावर परिसंवाद आणि खुली लेख स्पर्धा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २१ जुलै २०२२ । मुंबई । महाराष्ट्राच्या इतिहासात ‘संयुक्त महाराष्ट्राचा लढा’ या लोकचळवळीला फार महत्व आहे. त्याशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पूर्णच होऊ शकणार नाही. १९५५ ते १९६० असा सलग पाच वर्षे संयुक्त महाराष्ट्र समितीने जो लढा दिला त्यातून मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. त्या जनआंदोलन लढयाचे नेतृत्व करणारे सर्वच आचार्य अत्रे, डांगे, एस. एम. जोशी, उद्धवराव पाटील, सेनापती बापट,शाहीर अमरशेख, थोर नेते या विजयाचे शिल्पकार होते. परंतु ज्याला तोफखाना म्हणता येईल असे वाणी आणि लेखणीने जबरदस्त काम केले ते आचार्य अत्रे यांनी.

मराठी जनतेला संयुक्त महाराष्ट्र लढयासाठी उभे करण्यात अत्रेंचा सिंहाचा वाटा होता. राजकीय नेते हे सगळीकडे वा सगळ्या राज्यांमध्ये सारखेच असतात, पण असे म्हटले जायचे की महाराष्ट्रातील राजकारण एकेकाळी सभ्यतेच्या पातळीवर होते. परंतु गेल्या काही वर्षांत सत्ताकारणासाठीच्या राजकीय घडामोडी पाहाता सर्वसामान्य मराठी माणसाला काही प्रश्न पडले आहेत. या अनुषंगाने मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई आणि आचार्य अत्रे स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कुठे नेऊन ठेवलाय आचार्य अत्रेंचा महाराष्ट्र !’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई आणि चित्रलेखाचे संपादक, ज्येष्ठ पत्रकार आणि सुप्रसिद्ध वक्ते ज्ञानेश महाराव आपले विचार मांडणार आहेत. तर राजेंद्र पै हे आपले आजोबा ‘आचार्य अत्रे यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र’ या विषयावर बोलणार आहेत. शुक्रवार, दि. २९ जुलै २०२२ रोजी संध्याकाळी ६ .३० वा धुरु हॉल, दादर सार्वजनिक वाचनालय, दादर – पश्चिम येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर या विषयावर खुली लेख स्पर्धा आयोजित केली आहे. ३०० शब्दात मराठीमध्ये टाईप करून लेख दि 26 जुलै पर्यंत chalval 1949@ gmail.com या मेलवर अथवा 8779983390 राजन देसाई यांच्या व्हाट्सअपवर पाठवावा. स्पर्धेत भाग घेणाऱ्यांना तीन रोख पारितोषिक व सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे असे संघाचे प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगांवकर यांनी तर कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे आणि आचार्य अत्रे स्मारक समितीच्या अध्यक्षा ऍड आरती पुरंदरे-सदावर्ते यांनी केले आहे.

रवींद्र मालुसरे 
अध्यक्ष,मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई ९३२३११७७०४ 

Back to top button
Don`t copy text!