दैनिक स्थैर्य । दि. २९ नोव्हेंबर २०२१ । वाठार स्टेशन । सातारा जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असणाऱ्या वाठार स्टेशन मधील वाग्देव चौक हा गेली कित्येक वर्षे झाली अनधिकृत बॅनरच्या विळख्यात अडकलेला असून हा चौक मोकळा श्वास कधी घेणार असा संतप्त सवाल वाठार स्टेशनचे माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते नामदेव जाधव यांनी ग्रामपंचायत वाठार स्टेशन व पोलीस प्रशासनाला केला आहे.
वाठार स्टेशन येथील मुख्य चौक म्हणून वाग्देव चौकाकडे पाहिले जाते त्यातच या चौकामध्ये विद्यालय व महाविद्यालय असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर वर्दळ तसेच येणाजाणाऱ्या प्रवाशांची गर्दी असते, कित्येकदा या अनधिकृत बॅनरमुळे अपघात होत असतात दोन्ही बाजूने वळणे असल्याने या वळणावरतीच वाढदिवस, पक्षीय निवडी, दुकानांचे उदघाटने, मेळावे अशा प्रकारचे बॅनर सर्रास प्रमाणे लावले जातात या अशा बॅनर्सचा आदर्श शेजारी असणाऱ्या विद्यालयातील विद्यार्थी काय घेणार? या बनर्सचा विळखा या वाग्देव चौकाला एवढा मोठ्या प्रमाणावर पडताना दिसत आहे की या बॅनर आडून अवैद्य धंदे बोकाळू लागले आहेत. काही वर्षांपूर्वी येथील सैनिक मोहन जाधव यांने या अनधिकृत बॅनर्सच्या विरोधात एक दिवस या चौकातील झेंड्याखाली बसून आंदोलन केले होते परंतु येथील पोलीस प्रशासन व फुकट्या पुढाऱ्यांनी हात ओला तर मैतर भला असा रोल बजावत या सैनिकाला त्रास दिला. आता मात्र या चौकात घाणीचे साम्राज्य व अनधिकृत बॅनर्सनी थैमान घातले आहे व या बाबींचा लवकरात लवकर बंदोबस्त केला नाही तर या संदर्भात जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे धाव घेणार असल्याचे माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते नामदेव जाधव यांनी सांगितले.