
दैनिक स्थैर्य | दि. २० ऑगस्ट २०२३ | फलटण | सुरेश भोईटे |
फलटण तालुक्यातील आरडगाव या गावाला एक राजकीय वारसा आहे. मात्र, याच गावाला सध्या पाणीप्रश्नाने हैराण केले आहे. यावर्षी पावसाने या भागाला पाठ दाखवल्याने पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न भेडसावत आहे.
गावाच्या जवळच दोन धरणे आहेत. त्यातील एक म्हणजे तांबवे धरण व दुसरे धरण म्हणजे लेंढीचे धरण. मात्र, ही दोन्हीही धरणे यावर्षी पाऊस अगदी कमी पडल्याने पूर्णतः पाण्याविना कोरडी ठणठणीत पडली आहेत. त्यामुळे ‘दोन्ही धरणे गावच्या उशाला, मात्र कोरड पडली लोकांच्या घशाला’, असे म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर आलेली आहे.
पाऊस नसल्याने शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी राजा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. त्याची अवस्था चिंतातूर जंतूसारखी झालेली आहे.
आरडगाव, चव्हाणवाडी, कापडगाव या तिन्ही गावांचा पाणीपुरवठा लेंडीच्या धरणातून खोदलेल्या विहिरीतूनच केला जातो. मात्र, यावर्षी पावसाने या भागात पाठ दाखवल्याने या भागातील आरडगावचा पाणीप्रश्न मोठा गंभीर झालेला आहे. दरवर्षीच पाऊस न पडल्यानंतर आरडगावची अशीच पाण्याची बोंबाबोंब असते.
या भागातील चव्हाणवाडीजवळ असणारे लेंढीचे धरण पाण्याविना कोरडे पडले आहे. आरडगावला तर दहा दिवसांतून एकदा पाणी येत असल्याने परस्थिती मोठी गंभीर झाली होती. मात्र, सध्या वरील विदारक परिस्थितीचे चित्र फलटण कोरेगाव तालुक्याचे आमदार दिपक चव्हाण यांना दूरध्वनीद्वारे आमच्या प्रतिनिधीने सांगितल्यानंतर तत्पर फलटण प्रशासनामार्फत आरडगावला दरदिवशी दोन टँकरद्वारे (अंदाजे पाणी ४४ हजार लिटर ) पाण्याची सोय करण्यात आलेली आहे. त्यामुळे लोकांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सद्य:स्थीतीला मिटलेला आहे. त्यामुळे वेळेत आमदार साहेबांनी पाण्याच्या टँकरची सोय केल्याने ग्रामस्थांमधून त्यांचे अभिनंदन व कौतुक केले जात आहे.
आरडगावला जलजीवन मिशन हर घर जल, नळ पाणीपुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता दि. २७ जुलै २०२२ रोजी मिळालेली आहे. तांबवे धरणात विहीर खोदून ते पाणी पाईपलाईनव्दारे या गावी आणले जाणार आहे. त्याचा खर्च अंदाजे १ कोटी ८४ लाख ९९ हजार ५७० एवढा आहे. त्याला केंद्र शासनाने मंजुरी दिलेली असून ते काम पूर्णत्वास होण्यासाठी दि. २५ मे २०२४ चा कालावधी दिलेला आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी नऊ महिन्यांचाच कालावधी राहिला आहे.
गावच्या लगतच वनविभागाची हद्द लागते व याच वनविभागातून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन खोदून आणावयाची आहे. यासाठी वनविभागाची परवानगी लागते. वनविभागाने अजूनही परवानगी न दिल्याने या जलजीवन मिशनच्या कामाला ब्रेक लागला आहे. बाकी कामे सुरू आहेत. मात्र, हे काम जलद होण्यासाठी विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दिपक चव्हाण, माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर या सर्वांनी विशेष लक्ष घालून ही वनविभागाची लागणारी परवानगी मिळवावी, म्हणजे या कामास गती येईल व आरडगावचा पाणीप्रश्न कायमचा मिटेल.
सध्या धोम बलकवडी धरणातील पाणी कॅनॉलव्दारे सोडले गेले आहे. तेच पाणी तांबवे धरणात सोडून तांबवे धरण भरून घ्यावे व तांबवे धरणातील पाणी पोटफाटयाने सोडून लेंढीचे धरण भरावे, म्हणजे सध्यातरी असणारी पाणीटंचाई दूर होईल. यासाठी पाणी सोडण्यासाठी संबंधित अधिकार्यांना लोकप्रतिनिधींनी तशा सूचना द्याव्यात, अशी आग्रही मागणी परिसरातील जनतेमधून होत आहे
– सुभेदार भोईटे, माजी सरपंच, आरडगाव

