
स्थैर्य, गिरवी, दि. ०७ ऑगस्ट : फलटण तालुक्यात मे महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती आणि घरांचे लाखो रुपयांचे नुकसान होऊन दोन महिने उलटले तरी, अद्याप कोणतीही आर्थिक मदत मिळाली नसल्याने बाधित शेतकरी व नागरिक हवालदिल झाले आहेत. प्रशासनाकडून नुकसानभरपाईबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
मे महिन्यातील अतिवृष्टीने गिरवी, धुमाळवाडी, निरगुडी, वडले यांसह अनेक गावांमध्ये पिके, फळबागा, घरे आणि रस्त्यांचे मोठे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पंचनामे आणि आवश्यक कागदपत्रे प्रशासनाकडे जमा केली आहेत, मात्र मदतीच्या प्रतीक्षेत त्यांची दमछाक होत आहे. वारंवार हेलपाटे मारूनही मदत मिळत नसल्याने नागरिक कंटाळले आहेत.
नुकसानभरपाई कधी आणि किती मिळणार, याबाबत कोणताही अधिकारी माहिती देत नसल्याने शेतकऱ्यांचा गोंधळ उडाला आहे. अशातच, काही शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा झाल्याची खाजगीत चर्चा सुरू झाल्याने गावागावांतील पारावर उलटसुलट चर्चांना पेव फुटले आहे.
संबंधित अधिकाऱ्यांनी नुकसानभरपाईच्या वितरणाबाबत सविस्तर आणि अधिकृत माहिती जाहीर करावी, जेणेकरून शेतकऱ्यांच्या मनातील संभ्रम दूर होईल, अशी एकमुखी मागणी बाधित शेतकरी आणि नागरिक करत आहेत.