मुख्यमंत्री जेव्हा रुग्णाला आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देतात…

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १० जुलै २०२३ । मुंबई । भर वाहतुकीत बिघाड झालेली रुग्णवाहिका, त्यातील रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांची घालमेल ओळखून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देऊन त्यांना  रुग्णालयाकडे मार्गस्थ केले.

भरधाव वाहणाऱ्या वाहतुकीत खुद्द मुख्यमंत्रीच आपल्या मदतीला धावून आलेले पाहून रुग्णांचे नातेवाईक देखील गहिवरून गेले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज दिवसही नेहमीप्रमाणे व्यस्ततेचा होता. गडचिरोलीचा दौरा आटोपून ते मुंबईत परतल्यानंतर ते ठाण्याकडे जात होते. या दरम्यान चुनाभट्टी- कुर्ला येथील पुलावर एक रुग्णवाहिका बिघाडामुळे खोळंबल्याचे मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आले. रुग्ण, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा , गरजूंना औषधोपचारासाठी मदत या गोष्टी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्यासाठी अत्यंत संवेदनशील असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. रुग्ण आणि रुग्णवाहिकेतील नातेवाईकांची अडचण ओळखून मुख्यमंत्री श्री. शिंदे आपल्या वाहनातून उतरले आणि थेट बिघाड झालेल्या रुग्णवाहिकेजवळ पोहचले. त्यांनी परिस्थिती जाणून घेतली. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना धीर देत त्यांनी तिथूनच ठाण्यातील शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधला. त्याचवेळी त्यांनी आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देण्याचे निर्देश दिले. या रुग्णवाहिकेतून संबंधित रुग्ण आणि नातेवाईक ठाण्यातील रुग्णालयाकडे मार्गस्थ झाल्यानंतरच, मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा ताफा रवाना झाला.

 

प्रचंड वर्दळीच्या घाईत मुख्यमंत्रीच आपल्या मदतीला धावून आल्याचे पाहून, त्यांनी दिलेल्या धीरामुळे रुग्णाच्या नातेवाईकांचे हात आपसुकच जोडले गेले.

 


Back to top button
Don`t copy text!