स्थैर्य, फलटण, दि. 9 : आगामी शैक्षणिक वर्षात शाळा सुरु करताना किमान 10 वी चे वर्ग प्राधान्याने सुरु करावेत तसेच एक दिवसाआड वर्ग नियोजन, दुबार सत्र शाळा आदी विषयावर चर्चा करतानाच मुले शाळेत आल्यावर गर्दी होणार नाही याची खबरदारी घेणे, प्रार्थना वर्गातच घेणे, मधली सुट्टी इयत्ता नुसार विभागून देणे, पाणी पिण्यासाठी गर्दी होणार नाही यासाठी विद्यार्थ्यांना पाण्याची बाटली वापरण्याच्या सूचना देणे, ग्रंथालय, प्रयोगशाळा येथे विद्यार्थी गर्दी करणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचना सातारा जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेश क्षिरसागर यांनी केल्या आहेत.
सन 2020-2021 या शैक्षणिक वर्षात शाळा/विद्यालये सुरु करण्याबाबत चर्चा करण्यासाठी जयभवानी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तिरकवाडी ता. फलटण येथे आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना शिक्षणाधिकारी (माध्यमिक) क्षीरसागर बोलत होते. यावेळी फलटण पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी रमेश गंबरे, संस्थेचे अध्यक्ष आनंदराव शितोळे व त्यांचे सहकारी संस्था संचालक, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य, पोलीस पाटील अमोल नाळे, ग्रामस्थ, शिक्षक उपस्थित होते.
शिक्षणाधिकारी (माध्यमिक) क्षिरसागर यांनी प्रशाळेची विद्यार्थी संख्या, वर्ग खोल्यांची संख्या, ेंबेंच संख्या, उपलब्ध शिक्षक वगैरे बाबींचा आढावा घेतल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी सॅनिटायझर तसेच प्रत्येक वर्गासमोर मुलांना हात धुण्यासाठी साबण व पाणी उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना करतानाच त्यासाठी ग्रामपंचायत व स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून निधीची तरतुद करता येईल अशी सूचना केली.
गटशिक्षणाधिकारी रमेश गंबरे यांनी कंटेनमेंट झोन वगळून उर्वरित क्षेत्रातील मुलांना शाळेत येता येईल त्यासाठी आगामी शैक्षणिक वर्षात शाळा सुरु करुन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळता येईल असे सुचविले. प्रारंभी पर्यवेक्षक काळे सर यांनी या विद्यालयात तिरकवाडीसह परिसरातून विद्यार्थी/विद्यार्थीनी शिक्षण घेत असल्याचे नमुद करीत परिसराविषयी आढावा सादर केला.
संस्थाध्यक्ष आनंदराव शितोळे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर विद्यालयाच्या उभारणी व शैक्षणिक गुणवत्तेसंबंधी माहिती दिली.