दैनिक स्थैर्य । दि. २४ एप्रिल २०२३ । मुंबई । उद्धव ठाकरे हे कायम संभ्रमावस्थेत बोलत असतात. पंतप्रधान मोदी यांचा त्यांनी सभेत एकेरी उल्लेख केला. १५०च्या पेक्षा जास्त देशांनी ७८ टक्के पसंती मोदीजींच्या नेतृत्वाला दिली. अशा पंतप्रधान मोदींचा ठाकरे एकेरी उल्लेख करतात. त्यांनी थोडासा अभ्यास केला पाहिजे. पंतप्रधान मोदींचे वादळ जेव्हा महाराष्ट्रात येईल तेव्हा उद्धव ठाकरे उडून जातील, अशा शब्दांत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला. पाचोऱ्यातील सभेत उद्धव ठाकरेंनी भाजपा, शिंदे गट आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकेच तोफ डागली होती. या टीकेला आज बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिले.
“पंतप्रधान मोदींच्या वादळाला उद्धव ठाकरे घाबरतात. म्हणूनच ते त्यांचं नाव घेऊन टाइमपास करतात. मोदींचे नेतृत्व संपूर्ण जगाला मान्य आहे. तुमच्याजवळ साधे दोन लोक राहायला तयार नाहीत. तुम्ही २०१४ आणि २०१९ मध्ये त्यांच्या बळावर निवडून आलात. भारताला सर्वोत्तम देश करण्याचा संकल्प त्यांनी केलाय आणि तुम्ही त्यांची खिल्ली उडवत आहात. याला बेईमानी म्हणतात. तुमची उंची काय? तुमच्या शिल्लक राहिलेली लोकंही मोदीजींच्या कृपेनेच निवडून आलेत. २०२४ला मोदीजींच्या वादळात तुमच्या मशाली विझतील,” असा घणाघात त्यांनी केला.
“कुठे सूर्य आणि कुठे तुम्ही? मी मागे देखील बोललो होतो की उद्धव ठाकरेंनी सार्वजनिक ठिकाणी बोलत असताना तारतम्य पाळलं पाहिजे. वैयक्तिक टीका करून कुणाचाही अपमान करू नये असं मी मागेही म्हणालो होतो. ते मात्र वारंवार आमच्या नेतृत्वाचा अपमान करत आहेत. ते जर अशा गोष्टी मुद्दाम वारंवार करत असतील तर त्याचा स्फोट होऊ शकतो. मोदींचा एकेरी उल्लेख करणे या गोष्टीचा स्फोट होऊ शकतो. आमच्या पक्षाच्या नेतृत्वांवर बोलताना तारतम्य बाळगा असं मी सांगितले आहे. ते जाणीवपूर्वक त्याच त्याच गोष्टी करत आहेत. अशा वेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष भडकू शकतो,” असा इशारा त्यांनी दिला.