दैनिक स्थैर्य । दि. ०६ ऑक्टोबर २०२१ । सातारा । सातारा- जावळी मतदारसंघाचा चौफेर विकास साधताना कोणत्या गावात काय समस्या आहे आणि ती समस्या कशी सोडवली पाहिजे, याची अभ्यासपुर्ण माहिती आणि जाण असणारे लोकप्रतिनिधी म्हणजेच आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले. याचा प्रत्यय परळी भागातील जनतेला पुन्हा एकदा आला आणि प्रश्न कोणताही असो.., उत्तर फक्त एकच आणि ते म्हणजे शिवेंद्रसिंहराजे..! याची प्रचितीही उपस्थितांना पुन्हा एकदा आली.
परळी भागातील विविध गावातील पाणीप्रश्न, रस्ते यासह मूलभूत सोयी सुविधा आणि विविध समस्या याबाबत परळी येथे आढावा बैठक झाली. या बैठकीला आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, विद्यमान सदस्यता कमलताई जाधव, पंचायत समिती उपसभापती अरविंद जाधव,सदस्या विद्याताई देवरे, किसान जाधव, बापू कदम, विस्तार अधिकारी राक्षे, बांधकाम विभागाचे खैरमोडे, कास पठार विकास प्रतिष्ठानचे सोमनाथ जाधव, विविध गावचे ग्रामसेवक, सरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीला परळीसह देवकल, पांगारे, कास पठार भाग, सांडवली, ठोसेघर आदी भागातील सर्व गावचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत अंबवडे भागातील विविध गावाच्या नवीन पाणीपुरवठा योजनांबाबत सकरात्मक निर्णय घेण्यात आला. नवीन योजना तयार करण्यात येणाऱ्या अडचणींचा निपटारा आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जागेवरच केला आणि या योजना तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या. याशिवाय विविध गावातील पाणंद रस्ते, अंतर्गत रस्ते यांवर चर्चा झाली. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रांताधिकारी, तहसीलदार यांना फोन करून पाणंद रस्त्यांचे प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याच्या सूचना यावेळी केल्या.
परळी भागातील सर्वच गावांचा प्रत्येक प्रश्न सोडवून कोट्यवधींची विकासकामे मार्गी लावली आहेत. प्रत्येक गावातील समस्या सोडवणे हे आपले कर्तव्य आहे आणि याच भावनेतून आजवर काम केले आणि पुढेही करत राहू. कोणताही प्रश्न असू द्या, तो कसा सोडवायचा हे मला चांगले माहिती आहे. याबाबत तुम्ही काळजी करू नका, असा शब्दही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ग्रामस्थांना दिला.