स्थैर्य, नाशिक, दि. १: बैठकीत स्टेजवर सगळेच राजकारणी, साहित्य संमेलनात राजकारणी नकाे. ‘संमेलनावर राजकारण्यांचीच छाप’ अशा बातम्या आम्ही बघताे, वाचताे. आम्हा राजकारण्यांचा स्टेज व्यापण्याचा इरादाही नाही. पण एक लक्षात घ्या, आम्हीही वाचक आहाेत. साहित्य आम्हालाही कळतं आणि आम्ही नसलाे तर तुम्ही काय करणार? त्यामुळे आम्हालाही संधी दिली तर चांगलेच हाेईल, अशा शैलीत साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी ‘साहित्य संमेलनातील राजकारण्यांचा वावर’ या विषयावर सडेताेड प्रतिक्रिया दिली. ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी शहरातील विविध क्षेत्रांतील कलाकार, साहित्यिक आणि मान्यवरांच्या सूचना जाणून घेण्यासाठी गाेखले एज्युकेशन साेसायटीच्या सभागृहात बैठकीचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्या वेळी भुजबळांनी उपस्थितांशी संवाद साधला. ते म्हणाले की, विविध सूचनांचा पाऊस पडला आहे. पण हे संमेलन नाशिकचे संमेलन नसून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे.
देशभरातून लाेक येथे येत असतात. त्यामुळे ते आपले पाहुणे आहेत. आपल्याला त्यांचे प्राधान्याने एेकावे लागणार आहे. नाहीतर १५ दिवस संमेलन चालले तरी दिवस पुरणार नाही. संमेलनात कार्यक्रम काय घ्यायचे हे महामंडळाचे अध्यक्ष ठाले पाटील आणि पदाधिकारी ठरवतील. ते कसे ठरते याची मला कल्पना नाही. पण जास्तीत जास्त साहित्यिक नाशिकमध्ये यावे, त्यांची उत्तम व्यवस्था व्हावी, शहराला उत्सवाचे रूप यावे हे काम माझे आहे. स्टेजवर काेणत्या साहित्यिक मंडळींनी बसावे हे महामंडळ ठरवेल. मी एक नाशिककर म्हणून हे संमेलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहे. आलेल्या सूचनांपैकी काही सूचनांचा नक्कीच विचार केला जाईल. पण काही सूचनांचा विचार झाला नाही तर लगेच राजकारण केले, त्यांच्या त्यांच्या माणसांचाच विचार केला असे सूर उमटता कामा नये असेही ते म्हणाले.
महापालिकेने द्यावे ५० लाख : संमेलनासाठी शासनाने ५० लाख रुपयांचा निधी दिला आहे. तेवढीच रक्कम महापालिकेनेही द्यावी. शहरातील लाेकप्रतिनिधींनी त्यासाठी प्रयत्न करावेत असेही भुजबळ या वेळी म्हणाले. मात्र त्याआधीच महापाैर सतीश कुलकर्णी यांनी संवाद साधला असता महापालिकेकडून जी काही मदत करणे शक्य हाेईल ती नक्कीच केली जाईल असे जाहीर केले हाेते.
माध्यमांकडे जाऊ नका; माध्यमांनीही आम्हाला थोडे सांभाळून घ्यावे
ही बंधनकारक जबाबदारी मी स्वीकारली आहे. काेणत्याही प्रकारचे वादविवाद टाळा. मनातील विचार मला किंवा आयाेजन समितीतील काेणालाही सांगा, पण पत्रकारांना सांगू नका. आपल्याला नाशिकचे चांगले चित्र निर्माण करायचं आहे. काेणत्याही तक्रारी चव्हाट्यावर येता कामा नयेत. काेणीही संमेलनात निदर्शने करणार नाहीत याचीही जबाबदारी आपली सगळ्यांचीच आहे. त्यामुळे माध्यमांनीही आम्हाला थाेडे सांभाळून घ्यावे असे आवाहनही भुजबळांनी माध्यमांना केले.
संमेलननगरीला अखेर कुसुमाग्रजांचेच नाव
नाशिक| साहित्य संमेलननगरीला स्वातंत्र्यवीर विनायक दामाेदर सावरकर असे नाव द्यावे अशी मागणी काही संघटनांनी केली हाेती. मात्र ज्ञानपीठ सन्मानित कविवर्य कुसुमाग्रज यांचेच नाव संमेलननगरीला देण्यात येणार असल्याचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी जाहीर केले.
नाशिकमध्ये गाेखले एज्युकेशन साेसायटीच्या प्रांगणात ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हाेत आहे. या संमेलननगरीला स्वा. सावरकर यांचे नाव द्यावे अशी मागणी भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूह तसेच इतर काही हिंदुत्ववादी संघटनांनी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष काैतिकराव ठाले पाटील यांच्याकडे रविवारी (दि. २४) केली हाेती. त्यावर विचार नक्कीच करू, असेही त्या वेळी ठाले यांनी सांगितले हाेते. दरम्यान भुजबळांच्या या घाेषणेमुळे आता स्वा. सावरकरांचे नाव कुठे देणार हा प्रश्न उपस्थित हाेताे. मुख्य सभामंडपाला, मुख्य मंचाला की ग्रंथनगरीला त्यांचे नाव देतात का? याकडे सावरकरप्रेमींचे लक्ष लागले आहे. मात्र भुजबळांनी संमेलननगरीच्या नावावरून होणाऱ्या संभाव्य वादास पूर्णविराम दिला आहे.