दैनिक स्थैर्य । दि.३१ जानेवारी २०२२ । मुंबई । भारतीय बाजारांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून लागलेला आयपीओ धडाका तसाच पुढे सुरू आहे. गुंतवणूकदार आता वेदांत फॅशन्स लिमिटेडद्वारे येणाऱ्या सार्वजनिक प्रस्तावाकडे डोळे लावून बसले आहेत. मान्यवर, मोही, मंथन आणि त्वमेव यांसारख्या काही लोकप्रिय ब्रॅण्ड्समागील शक्ती म्हणून ही कंपनी ओळखली जाते. वेदांत फॅशन्सला बाजारात उतरण्यापूर्वी अत्यंत आवश्यक असलेली मान्यता या ब्रॅण्ड्सच्या एकंदर लोकप्रियतेमुळे प्राप्त झाली आहे आणि जोडीला दमदार वित्तीय कामगिरी नावावर असल्याने, आयपीओ गुंतवणूकदारांना मोठी मूल्यनिर्मिती करून देईल, असे अपेक्षित आहे. वेदांत फॅशन्स लिमिटेडचा आयपीओ काय आहे याबद्दल सविस्तर सांगताहेत एंजेल वनचे एव्हीपी मिडकॅप्स, श्री. अमरजीत मौर्य.
कंपनी विषयी:
वेदांतने पुरुषांसाठीच्या एथ्निक ब्रॅण्ड्सवर लक्ष केंद्रित केले आहे आणि प्रामुख्याने भारतातील उत्सवी पोशाखांच्या बाजारपेठेची मागणी कंपनी पूर्ण करते. हे खरेदीचे वन-स्टॉप डेस्टिनेशन असल्यासारखे आहे. वेदांत फॅशन्समध्ये ग्राहकांना सर्व प्रकारच्या प्रसंगांसाठी आवश्यक असलेले एथ्निक (पारंपरिक) कपडे मिळू शकतात. याशिवाय, वेदांत फॅशन्सची उत्पादने मल्टी-ब्रॅण्ड स्टोअर्स, बिग फॉरमॅट स्टोअर्स व ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवरही उपलब्ध आहेत.
आयपीओचे तपशील:
प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव ४ फेब्रुवारी रोजी खुला होणार आहे आणि प्रारंभिक विक्री आरएचपीनुसार (रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस) ८ फेब्रुवारी रोजी समाप्त होईल. विक्री प्रस्तावामध्ये, प्रमोटर्स व वर्तमान समभागधारकाच्या ३,६३,६४,८३८ इक्विटी समभागांचा समावेश असेल. प्रत्येक समभागाचे दर्शनी मूल्य १ रुपया असेल आणि अपेक्षित दरश्रेणी प्रति इक्विटी समभाग ८२४ रुपये ते ८६६ रुपये असेल. एका लॉटमध्ये १७ समभाग आहेत आणि एक गुंतवणूकदार जास्तीतजास्त १३ लॉट्ससाठी अर्ज करू शकतो. जारीकरणानंतरचे (पोस्ट-इश्यू) बाजार भांडवलीकरण १९,९९८-२१,०१७ कोटी रुपयांच्या आसपास अपेक्षित आहे.
वर्तमान समभागधारणा:
ऱ्हाइन होल्डिंग्जकडे सध्या कंपनीच्या ७.२ टक्के भागाची मालकी आहे, तर ०.३ टक्के केदारा एआयएफकडे आहे. रवी मोदी फॅमिली ट्रस्टकडे कंपनीची ७४.६७ टक्के मालकी आहे. इश्यूचे बुक रनिंग लीड व्यवस्थापक अक्सिस कॅपिटल, एडलवाइज फायनान्शिअल सर्व्हिसेस, आयसीआयसीआय सिक्युरिटीज, आयआयएफएल सिक्युरिटीज आणि कोटक महिंद्रा कॅपिटल हे आहेत. प्री-इश्यू प्रमोटर होल्डिंग ९२.४० टक्के आहे.
कंपनीच्या कामकाजाचा आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत विस्तार:
सप्टेंबर २०२१पासून फर्मच्या जागतिक रिटेल नेटवर्कमध्ये ५४६ एक्स्लुजिव ब्रॅण्ड आउटलेट्सचा (ईबीओ) समावेश आहे. यामध्ये ५८ शॉप-इन-शॉप्स तर अमेरिका, कॅनडा व संयुक्त अरब अमिरातीतील भारतीय लोकसंख्या अधिक असलेल्या प्रदेशांतील ११ ईबीओंचा समावेश आहे. अशा रितीने उद्योगाचे एकंदर कार्यक्षेत्र विस्तृत आहे. ते केवळ भारतातच नव्हे, तर वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण बाजारपेठांमध्ये पसरलेले आहे.
सारांश:
सर्वांत प्रसिद्ध मेन्स वेडिंग वेअर ब्रॅण्ड्सपैकी एक असलेला वेदांत लिमिटेड अन्य सूचित आयपीओंच्या स्पर्धेत उतरला आहे. कंपनीची दिशा सकारात्मक दिसत आहे. यांत भारताला आघाडीचे स्थान आहे आणि भारतीय ब्रॅण्डने शेअर बाजारात यशस्वीरित्या ठसा उमटवण्याची ही पहिली किंवा अखेरची वेळ नाही. यामुळे ब्रॅण्डला असलेल्या मान्यतेत वाढ होईल आणि त्याच्या इक्विटीला सार्वजनिक बाजारपेठ पुरवली जाईल.