
स्थैर्य, सातारा, दि.२०: कोरोना महामारीमध्ये लॉकडाऊन झाल्यानंतर राजवाडा चौपाटी बंद करण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सर्वकाही चालू झाले मात्र पालिकेने स्वच्छतेचे कारण पुढे करून चौपाटी बंदच ठेवली. व्यवसाय बंद असल्याने या व्यावसायिकांची उपासमार होत होती मात्र कोणीही लक्ष दिले नाही. आता पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला असून रुग्ण वाढीमुळे पुन्हा लॉकडाऊन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राजवाडा चौपाटी सुरुच करायची होती तर आधी का नाही केली एवढ्या उशिरा सुरु करण्याचा निर्णय का घेतला? यामागचे नेमके गौडबंगाल काय असा प्रश्न नगरविकास आघाडीचे पक्ष प्रतोद अमोल मोहिते यांनी केला असून आर्थिक तडजोडीसाठी पालिका पदाधिकाऱ्यांनी इतके दिवस त्यांची उपासमार केली अशी चर्चा शहरात दबक्या आवाजात सुरु असल्याचेही म्हटले आहे.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात मोहिते यांनी म्हटले आहे की, कोरोना महामारीमुळे गेल्या कित्तेक महिन्यांपासून राजवाडा चौपाटी बंद होती. लॉकडाऊन उठल्यानंतरही स्वच्छतेचे कारण पुढे करून सातारा पालिकेने चौपाटी बंद ठेण्याचा निर्णय घेतला. त्याठिकाणच्या व्यावसायिकांनी वारंवार मागणी करूनही चौपाटी सुरु झाली नाही. तसेच चौपाटीवरील व्यावसायिकांना दुसरी जागाही निश्चित करण्यात आली मात्र व्यावसायिकांनी त्याला विरोध करून राजवाडा चौपाटी सुरु करण्याचा आग्रह धरला होता. व्यावसायिक आणि त्यांच्या कुटुंबीयांची कित्तेक महिन्यांपासून उपासमार सुरु होती. काही व्यावसायिकांवर आत्महत्या करण्याचीही वेळ आली. त्यावेळी कोणीही या प्रश्नाकडे लक्ष दिले नाही. आता पुन्हा कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली आहे. कोरोनामुळे इतके दिवस बंद असणारी राजवाडा चौपाटी आता पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना इतक्या उशिरा चौपाटी सुरु करण्याचा निर्णय घेतला याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. चौपाटी सुरूच करायची होती तर मग यापूर्वी का सुरु केली नाही असा सवाल उपस्थित होत असून यामागचे गौडबंगाल काय, असा सवाल मोहिते यांनी उपस्थित केला आहे.
चौपाटी बंद असल्याने संबंधितांची उपासमार सुरु होती. व्यावसायिकांनी वारंवार मागणी करूनही एवढे दिवस पालिकेने चौपाटी सुरु केली नाही. मग एवढे दिवस व्यावसायिकांचे हप्ते ठरवण्यासाठी वेळ गेला का, किती हप्ता घ्यायचा हे ठरत नव्हते का, अशी चर्चा शहरात दबक्या आवाजात सुरु आहे. त्यामुळे चौपाटी होती त्याच ठिकाणी सुरु करायची होती तर मग ती यापूर्वीच का सुरु केली नाही आत्ताच, तेही कोरोनाचा पुन्हा प्रादुर्भाव वाढत असतानाच चौपाटी सुरु करण्याचा निर्णय का घेतला, यामागचे गौडबंगाल काय आहे, असा प्रश्नही मोहिते यांनी उपस्थित केला आहे.
चौपाटी दादांचा आश्रयदाता कोण?
उशिरा का होईना चौपाटी सुरु करण्याचा निर्णय पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला पण, या चौपाटीवरील व्यावसायिकांचे हप्ते गोळा करणाऱ्या चौपाटी दादांचे काय? चौपाटी दादांमुळे राजवाडा चौपाटीवर अनेकदा हाणामाऱ्या झाल्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे या चौपाटी दादांचा आश्रयदाता कोण आहे? व्यावसायिकांना समाधानाने आणि निर्भीडपणे व्यवसाय करण्यासाठी पालिकेने चौपाटी दादांचा बंदोबस्त करण्यासाठी काही उपाययोजना केली आहे का, अशी विचारणाही मोहिते यांनी पत्रकात केली आहे.