स्थैर्य, मुंबई, दि. 3 : कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे मुंबई-ठाणे परिसरात पुन्हा लॉकडाउनचा निर्णय घेताना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना विश्वासात न घेतल्याने सत्ताधारी आघाडीत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची सुमारे दीड तास चर्चा झाली. या बैठकीत लॉकडाउनच्या गोंधळाबाबत व धरसोडीच्या धोरणाबाबत शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. मुंबईत दोन किलोमीटरच्या बाहेर संचार न करण्याची अट, वाहने जप्त करण्याची कारवाई थांबवली जाण्याची शक्यता आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने एकीकडे मिशन बिगीन अगेन चा दुसरा टप्पा सुरू करतानाच दुसरीकडे ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेल, नवी मुंबई, मीरा-भाईंदर आदी शहरात पुन्हा लॉकडाउन करण्यात आले आहे. मुंबईतही मुक्त संचारावर निर्बंध घालून पोलिसांनी वाहने जप्त करण्याची कारवाई सुरू केली आहे. हे निर्णय घेताना राज्य मंत्रिमंडळात कोणतीही चर्चा झाली नव्हती तसेच वेगवेगळ्या शहरांमध्ये लॉकडाउन कडक करताना वेगवेगळे नियम लागू केल्यामुळे गोंधळाची स्थिती आहे आहे. याबद्दल काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन तीव्र नाराजी व्यक्त केली होती. अधिकारी मंत्र्यांशी चर्चा न करता परस्पर निर्णय घेत असल्याबद्दल त्यांनी आक्षेप घेतला होता. या पार्श्वभूमीवर आज शिवाजी पार्क येथील स्व.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली.
अडीच महिन्यांच्या लॉकडाउननंतर जीवनचक्र पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संपूर्ण खबरदारी घेऊन व्यवहार सुरू केले नाही तर अर्थव्यवस्था कोलमडून पडेल व सर्वसामान्य लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न गंभीर होईल. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. घाईघाईत घेतलेल्या निर्णयामुळे व धरसोडीच्या धोरणामुळे अडचणी वाढत असल्याचे काँग्रेस-राष्ट्रवादीचे म्हणणे आहे. आजच्या बैठकीत यावर चर्चा झाली असून उद्यापर्यंत काही बदल झालेले दिसतील असे राष्ट्रवादीच्या एका नेत्याने सांगितले तसेच यापुढे तिन्ही पक्षाच्या प्रमुख मंत्र्यांशी चर्चा करून मोठे निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केल्याचे समजते.