स्थैर्य, फलटण : सध्या जगभरात कोरोना या जीवघेण्या आजाराने थैमान घातलेले आहे. फलटण तालुक्यात कोरोनाने आपले हात पाय चांगलेच पसरले असून आगामी काळात कोरोना फलटण तालुक्यात वाढेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी ऑगस्ट महिन्यापासून आर्थिक घडी जागेवर येण्यासाठी अनलॉकचे पर्व सुरु केलेले आहे. सध्या सातारा जिल्ह्यामध्ये सर्व बाजारपेठा ह्या सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरु असतात. त्या मुळे ग्रामीण भागातील आर्थिक घडी जी विस्कटली होती ती आता रुळावर येण्यासाठी सुरवात झालेली आहे. परंतु आता कोरोनाचे आकडेही चांगलेच वाढताना दिसत आहेत. सुरवातीच्या काळात फलटण शहरासह फलटण तालुक्यामध्ये कोरोनाला आळा घालण्यात चांगले यश आलेले होते. परंतु केंद्र व राज्य सरकारकडून जसजसे अनलॉक पर्व सुरु करण्यात आले तसतसे फलटण शहरासह तालुक्यातही कोरोनानी आपले हात पास चांगलेच पसरले. आताच्या अनलॉक पर्वामध्ये जवळपास सर्व बाजारपेठ सुरु करण्यास सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी परवानगी दिलेली आहे.
काल ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत फलटण तालुक्यात एकूण ऍक्टिव्ह रुग्ण १०१ होते त्या पैकी होम आयसोलेशन म्हणजेच गृह अलगीकरणात ४४, कोरोना केअर सेंटर मध्ये ३२ तर DCHC या विभागात १५ व कोविड हाॅस्पीटल येथे १० रुग्ण आहेत. तर फलटण तालुक्यात कोरोनामुळे १० जणांचा मृत्यू झालेला आहे व २४२ जण फलटण तालुक्यातून कोरोनमुक्त झालेले आहेत. व आज अखेर फलटण तालुक्यात एकूण मिळून ३५३ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. ११८८ व्यक्ती होम क्वारंटाईन असून त्यांचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला नाही. अशी माहिती फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांनी दिली.