
दैनिक स्थैर्य । दि. २५ सप्टेंबर २०२१ । फलटण । प्रसन्न रुद्रभटे । पुणे ते बंगळुरू हा नवीन हरित महामार्ग बांधला जात आहे. पुणे – फलटण – बेळगाव – बंगळुरू असा हा मार्ग जाईल, अशी स्पष्टोक्ती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल पुणे येथील समारंभादरम्यान केली. त्या नंतर सर्वांच्याच मनामध्ये प्रश्न उपस्थित झाला कि, हरित महामार्ग म्हणजे नक्की काय ? हरित महामार्ग हि संकल्पना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांनी नुसती घोषित केली नसून देशामध्ये विविध ठिकाणी हि योजना सत्यात सुद्धा उतरवली आहे. देशामध्ये आता विविध हरित महामार्ग करण्यासाठी त्याची क्वालिटी उत्तम राखण्यासाठी ना. गडकरी हे स्वतः आग्रही असतात. त्या मुळे हा हरित महामार्ग कसा असेल, याचा आज आपण थोडक्यात आढावा घेवू…..
फलटण मार्गे जाणार पुणे – बंगळूर नवीन हरीत महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची स्पष्टोक्ती
देशात सध्या सुमारे ४७ लाख किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. त्यातील महामार्गाचं अंतर आहे सुमारे एक लाख किलोमीटर. या योजनेअंतर्गत आणखी सुमारे चार हजार किलोमीटर लांबीचे नवीन महामार्ग बनविण्यात येत आहेत. हे सारे सुमारे एक लाख चार हजार किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग हरित करताना रस्त्याच्या दुतर्फा झाडी लावली जातात. हरित महामार्गासाठी निधीची कमतरता पडू नये यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पासाठीच्या एकूण रकमेपैकी एक टक्का रक्कम खास वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनासाठी राखून ठेवली जात आहे. या प्रकल्पाअंतर्गत महामार्गालगत मुख्यत: फळझाडांची लागवड करण्यात येते. त्यासाठी त्या त्या क्षेत्रतील भौगोलिक स्थितीचाही विचार केला जाईल. उदाहरणार्थ कोकणातील महामार्गाच्या कडेनं हापूस आंबे तर छत्तीसगडमध्ये चिंचेची झाडे लावली जातात. ग्रामीण रोजगाराला चालना देताना ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत स्थानिक बेराजगारांना रोजगारही या अंतर्गत उपलब्ध करून देण्यात येतो. पूर्वी रस्त्यांच्या प्रकल्प अहवालात वृक्षारोपणासाठी लागणाऱ्या अतिरिक्त जागेचा विचारच होत नव्हता. परंतु केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांनी हरित महामार्गाच्या प्रकल्पात त्यासाठी खास जमीन अधिग्रहण केली जाण्याची तरतूद केलेली आहे. वृक्षारोपणाचा अनुभव असलेल्या, स्वत:ची नर्सरी असलेल्या जाणकारांचा गट तयार करून त्यांच्याकडेच वृक्षारोपणाचे व संवर्धनाचे काम हरित महामार्गाच्या अंतर्गत सोपवले जाते.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांचे असे मत आहे कि, आजमितीस पर्यावरण संरक्षणासाठी सर्वच कॉर्पोरेट कंपन्यांनी पुढे येण्याची गरज आहे. विकासकामे होताना झाडे तोडावी लागतात. मात्र कॉर्पोरेट कंपन्यांनी पुढाकार घेऊन अशाप्रकारे आपल्या सीएसआरच्या माध्यमातून वृक्षलागवडीस चालना देण्याची आवश्यकता आहे. यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण संपूर्णपणे सहकार्य करण्यास तयार आहे.