दैनिक स्थैर्य | दि. २२ नोव्हेंबर २०२४ | फलटण |
सन २०२४ विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया बुधवार, दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी संपूर्ण राज्यात पार पडली. पक्षफुटीच्या अभूतपूर्व राजकारणानंतर पार पडलेल्या यंदाच्या निवडणुकीत फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघात दोन राष्ट्रवादी काँग्रेस प्रामुख्याने आमने – सामने असल्याचे पहायला मिळाले.
गेली १५ वर्षे आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व राजे गटाच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या ‘घड्याळ’ या चिन्हावर निवडून आलेले आमदार दीपक चव्हाण यंदाच्या निवडणुकीत नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्हावर राजे गटाच्या माध्यमातूनच निवडणूक लढले आहेत, तर भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पुरस्कृत केलेले सचिन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘घड्याळ’ या चिन्हावर निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. या दोघांसह अन्य १२ उमेदवार आपले नशीब आजमावत असून पुढच्या पाच वर्षांसाठी राज्याच्या विधानसभेत फलटणचे नेतृत्त्व कोण करणार? याची उत्सुकता शनिवार, दि. २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीअंती संपणार आहे. तूर्तास गत सन २०१९ च्या विधानसभा पंचवार्षिक निवडणुकीच्या निकालात नक्की काय झाले होते, ते पाहू.
सन २०१९ च्या फलटण विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दीपक चव्हाण यांना दिगंबर आगवणे यांनी भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर तगडे आव्हान दिले. या निवडणुकीत १२ उमेदवार उतरले होते. दीपक चव्हाण यांना १ लाख १७ हजार ६१७ मते मिळाली तर दिगंबर आगवणे यांना ८६ हजार ६३६ मतदारांनी आपली पसंती दर्शवली. यात ३० हजार ९८१ मतांचे मताधिक्य मिळाल्यामुळे दीपक चव्हाण तिसर्यांदा विधानसभेवर विजयी झाले. निवडणुकीतील अन्य उमेदवारांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अरविंद आढाव यांना ५ हजार ४६०, बहुजन समाज पक्षाचे प्रदीप उर्फ प्रेम मोरे यांना ९३४, अपक्ष कांचनकन्होजा खरात यांना ७८०, अपक्ष चंद्रकांत अहिवळे यांना ७३९, अपक्ष नंदकुमार मोरे यांना ६७३, प्रजासत्ताक भारत पक्षाचे अमोल पवार यांना ३४२, अपक्ष चंद्रकांत साळवी यांना ३०८, अपक्ष अमोल कारडे यांना २१६, अपक्ष पांडु अहिवळे यांना १८२ मते मिळाली. ३ लाख ३२ हजार ६७३ मतदारांपैकी २ लाख १५ हजार ९८७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
यंदा सुमारे ३ लाख ३९ हजार मतदारांपैकी २ लाख ३९ हजार मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून मतदानाचा टक्का वाढला असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे २०२४ च्या निवडणूक निकालात नक्की काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.