स्थैर्य, मुंबई, दि. ५: हाथरस अत्याचार त्यापाठोपाठ अभिनेता सुशांतसिंह प्रकरणात ‘एम्स’च्या अहवालामुळे मिळालेला दिलासा यामुळे गेले तीन महिने बॅकफूटवर गेलेल्या शिवसेनेने आता पुन्हा भाजपवर आक्रमकपणे हल्ले चढवण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखात सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून आरोप करणाऱ्या भाजप नेते आणि बिहारचे माजी पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सोबतच हाथरस प्रकरणात मौन बाळगल्यामुळे कंगना रनोटला देखील धारेवर धरले. ज्यांनी त्या मुलीवर बलात्कार केला ते या नटीबाईचे भाईबंद आहेत का? असा थेट सवाल कंगना रनोटला विचारला आहे.
‘एम्स’ने सुशांतप्रकरणी जो अहवाल दिला, तो अंध भक्त नाकारणार आहेत काय? सुशांत राजपूतच्या दुर्दैवी मृत्यूस 110 दिवस झाले. या काळात मुंबई पोलिसांची ज्यांनी यथेच्छ बदनामी केली, मुंबई पोलिसांच्या तपासावर ज्यांनी रोज प्रश्नचिन्ह निर्माण केले त्या राजकीय पुढाऱ्यांनी, कुत्र्यासारख्या भुंकणाऱ्या गलिच्छ वृत्तवाहिन्यांनी महाराष्ट्राची माफीच मागायला हवी. ज्यांनी मागच्या शंभर दिवसांत महाराष्ट्राची, मुंबई पोलिसांची यथेच्छ बदनामी केली, अशा गुप्तेश्वरी नट्या आणि ‘गुप्तेश्वर’आता कोणते प्रायश्चित्त घेणार आहेत? असा थेट सवाल शिवसेनेने अग्रलेखात उपस्थितीत केला आहे.
काय म्हटले अग्रलेखात?
‘सत्य हे कधीच दडपता येत नाही. सुशांत सिंहप्रकरणी हे सत्य अखेर बाहेर आलेच आहे. याप्रकरणी ज्यांनी महाराष्ट्राची यथेच्छ बदनामी केली, त्यांचे पुरते वस्त्रहरणच झाले आहे. सत्य आता ‘एम्स’ने बाहेर आणले. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्याच केली. त्याचा खून वगैरे झाला नाही असे सत्य पुराव्यासह ‘एम्स’चे डॉ. सुधीर गुप्ता यांनी समोर आणले आहे. डॉ. गुप्ता हे शिवसेनेच्या वैद्यकीय विभागाचे प्रमुख नाहीत. त्यांचा मुंबईशीही तसा संबंध दिसत नाही. डॉ. गुप्ता हे ‘एम्स’च्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख आहेत. याच ‘एम्स’मध्ये गृहमंत्री अमित शहा हे उपचारांसाठी दाखल झाले व बरे होऊन घरी परतले. ज्या ‘एम्स’वर देशाच्या गृहमंत्र्यांचाच विश्वास आहे, त्या ‘एम्स’ने सुशांतप्रकरणी जो अहवाल दिला, तो अंध भक्त नाकारणार आहेत काय?’ असा सणसणीत टोला सेनेनं भाजपला लगावला आहे.
‘एखाद्या तरुणाचा अशा प्रकारे मृत्यू होणे हे केव्हाही वाईटच. सुशांत वैफल्य, नैराश्याने ग्रासलेला होता. आयुष्याची उताराला लागलेली गाडी त्याला सावरता येत नव्हती. त्या धडपडीत तो भयंकर अशा अमली पदार्थांच्या नशेच्या आहारी गेला व एक दिवस गळफास घेऊन त्याने जीवन संपवले. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास काटेकोरपणे करतच होते. मुंबई पोलीस हे जगातले सर्वोत्तम पोलीस दल आहे, पण मुंबई पोलीस लपवाछपवी करीत आहेत, कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत असा धुरळा उडवला. त्यात बिहारच्याच नव्हे, तर देशभरातील काही गुप्तेश्वरांचा गुप्तरोग बळावला’ असा सणसणीत टोला सेनेनं भाजप नेत्यांना लगावला.
‘सुशांतच्या पाटण्यातील कुटुंबाचा वापर स्वार्थी, लंपट राजकारणासाठी करून केंद्राने हा तपास सीबीआयकडे ज्या जलदगतीने पोहोचवला ते पाहता ‘बुलेट ट्रेन’चा वेगही मंद पडला असेल. मुंबई पोलिसांनी तपासात जी नैतिकता व गुप्तता दाखवली ती एखाद्याचे मृत्यूनंतर धिंडवडे निघू नयेत यासाठीच, पण सीबीआयने मुंबईत येऊन तपास सुरू करताच पहिल्या 24 तासांतच सुशांतचे ‘गांजा’, ‘चरस’ प्रकरण बाहेर काढले. सुशांत हा एक चारित्र्यहीन, उडाणटप्पू तरुण कलाकार असल्याचे चित्र सीबीआय तपासानंतर बाहेर पडले. बिहारच्या पोलिसांना तपासात हस्तक्षेप करू दिला असता तर कदाचित सुशांत व त्याच्या कुटुंबाचे रोजच धिंडवडे निघाले असते. बिहार राज्याने व सुशांतच्या कुटुंबाने त्यासाठी मुंबई पोलिसांचे आभारच मानायला हवेत’, असा सल्लाच सेनेने सुशांतच्या कुटुंबीयांना दिला.
‘बिहार निवडणुकीत प्रचाराचा कोणताही मुद्दा नसल्याने नितीश कुमार व तेथील राजकारण्यांनी हा मुद्दा उचलला. त्यासाठी राज्याचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर यांना वर्दीतच नाचायला लावले व शेवटी हे महाशय नितीश कुमार यांच्या पक्षात सामील झाल्याने एक प्रकारे खाकी वर्दीचेच वस्त्रहरण झाले’ असा टोला सेनेने गुप्तेश्वर पांडे यांना लगावला.
‘रिया चक्रवर्तीने सुशांतला विष देऊन मारले हा ‘बनाव’सुद्धा चालला नाही, पण सुशांत ‘ड्रग्ज’ घेत होता व त्याला ते मिळवून दिले म्हणून अखेर त्या रिया चक्रवर्तीला तुरुंगात टाकले. सुशांतवर मृत्यूनंतर हाच खटला चालवण्याची कायदेशीर व्यवस्था असती तर ‘ड्रग्ज’ प्रकरणात सुशांतवर अमली पदार्थ सेवनाचा खटला चालला असता. सुशांतच्या मृत्यूचे ज्यांनी भांडवल केले, मुंबईला पाकिस्तानची, बाबराची उपमा दिली त्या नटीबाई आता कोणत्या बिळात लपल्या आहेत? हाथरसमध्ये एका तरुण मुलीवर बलात्कार करून मारले, तेथील पोलिसांनी त्या मुलीचा देह विटंबना करून काळोखात जाळला याबद्दल त्या नटीने डोळ्यात ग्लिसरीन घालूनसुद्धा दोन अश्रू ढाळले नाहीत. ज्यांनी त्या मुलीवर बलात्कार केला ते या नटीबाईचे भाईबंद आहेत का? ज्या पोलिसांनी त्या मुलीस जाळले ते पोलीस त्या नटीबाईचे घरगडी आहेत काय? असा थेट सवाल कंगना रनोटला विचारला आहे.
‘ज्यांनी मागच्या शंभर दिवसांत महाराष्ट्राची, मुंबई पोलिसांची यथेच्छ बदनामी केली, अशा गुप्तेश्वरी नट्या आणि ‘गुप्तेश्वर’ आता कोणते प्रायश्चित्त घेणार आहेत? जे महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या वाटेला गेले, त्यांचे साफ वाटोळे होते. बेइमान, हरामखोरांनी हे आता तरी समजून घ्यावे. हाथरस बलात्कार प्रकरणात शेपूट घालून बसणाऱ्यांनी महाराष्ट्राच्या मर्दानगीची परीक्षा घेऊ नये, असा इशाराही सेनेने दिला.