सुप्रसिद्ध ‘अक्षरकार’ कमल शेडगे यांचं मुंबईत निधन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि. ०४ : सुप्रिसद्ध ‘अक्षरकार’ कमल शेडगे यांचं आज मुंबईतील राहत्या घरी हृदयविकारानं निधन झालं. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे आणि सून असा परिवार आहे. मुलुंड येथे आजच त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

कमल शेडगे यांना मुळात चित्रकलेची आवड होती. १९५५ साली टाइम्स ऑफ इंडियात नोकरी सुरू केल्यानंतर ते अक्षरलेखनाकडे वळले. महाराष्ट्र टाइम्स सुरू झाल्यानंतर त्यांनी मराठी अक्षरलेखन सुरू केले. १९६२ साली ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकासाठी त्यांनी पहिल्यांदा ‘लेटरिंग’ केलं. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. मत्स्यगंधा, कट्यार काळजात घुसली, पुरुष, नाच गं घुमा, ज्वालामुखी, गुलमोहर अशी हजारांहून अधिक नाटके रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात कमल शेडगे यांच्या जादुई अक्षरलेखनाचा मोठा वाटा होता. फिल्मफेअर आणि माधुरी या मासिकांसाठी त्यांनी ‘लेटरिंग’ केलं होतं.

कमल शेडगे हे जिंदादिल कलाकार होते. तब्बल ५५ वर्षे अक्षरांच्या दुनियेत मुशाफिरी करणारे कमल शेडगे हे शेवटच्या दिवसापर्यंत कार्यरत होते. मिळालेल्या माहितीनुसार, कालही त्यांनी एका पुस्तकाचे लेटरिंग केले होते. ‘अक्षरांवर प्रेम करा’ असा संदेश ते या क्षेत्रातील नवोदितांना देत. शेडगे यांच्या निधनाने अक्षराच्या दुनियेतील चमत्कार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!